अहमदनगर (प्रतिनिधी) -

नेहमीप्रमाणे यंदाही नगरकरांच्या माथी दोन टक्के अग्निशमन कराचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला दिला

आहे. गेली नऊ वर्षे फेटाळला गेलेला प्रस्ताव दप्तरबंद करत त्याचा दहावा घातला जाणार की मंजुरी देऊन महासभेकडे पाठविला जाणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. अर्धवट स्थायी समितीच्या 9 तारखेच्या सभेत त्यावर निर्णय होणार आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता अग्नीशमन विभागाला फारसा निधी मिळत नाही. त्यातच शासनाने स्पेशल आदेश करत दोन टक्के अग्नीशमन कर लावण्याची सूचना महापालिकेला केली आहे. त्यामुळे अग्नीशमन विभाग दरवर्षी दोन टक्के अग्नीशमन लागू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करतो. मात्र गत दहा वर्षात एकदाही या प्रस्तावाला मान्यता मिळालेली नाही.

अग्नीशमन विभागाला सक्षम करण्यासाठी लागणारा खर्च या करातून मिळणार्या उत्पन्नातून भागविला जावू शकतो, त्यामुळे मालमत्ताधारकांकडून नव्याने दोन टक्के अग्नीशमन कर आकरणी करावा असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला दिला आहे. स्थायी समितीत त्यावर निर्णय होऊन नगरकरांवर नव्या कराचे ओझे पडते की नेहमीप्रमाणे तो फेटाळला जातो, याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

सभा की दप्तरजमा

दरवाढ किंवा नवीन कर लागू करण्यासाठी 19 फेब्रुवारीपूर्वीच महासभा होणे अपेक्षित आहे. त्या सभेने मंजुरी दिली तरच करवाढ होते किंवा नवा कर लागू होतो. 9 तारखेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली तरी 19 फेब्रुवारीपूर्वी महासभा होऊन त्या सभेलाही त्याला मान्यता द्यावी लागेल, तरच हा नवा कर लागू होईल. रविवारची सुट्टी, शिवजयंतीची सुटी पाहता महासभा 19 तारखेपूर्वी निघणे शक्य नाही. मात्र करवाढीचं काही ठरलं असेल तर सभा निघेल अन्यथा दरवर्षासारखं यंदाही या कराला दप्तरात गुंडाळून ठेवलं जाईल अशी चर्चा सुरू आहे.

5 कोटींची कामे

16 सदस्य असलेल्या स्थायी समितीतून 8 सदस्य 1 फेब्रुवारीला निवृत्त झाले आहेत. त्यामुळे केवळ आठ जणांची अर्धवट समिती कार्यरत असून या समितीची सभा 9 तारखेला होत आहे. सभापती मनोज कोतकर यांनी समितीची सभा बोलविली आहे. या समितीसमोर कचरा प्रक्रिया प्रकल्पासह विविध विषयांचे पाच कोटी रूपयांच्या विकास कामांचे प्रस्ताव आहेत. त्याला ही अर्धवट समिती आढेवेढे न घेता मंजूरी देईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाहन दुरूस्ती, वाहन खरेदी, कर्मचारी पगार यासाठी काही निधी या करातून उभा राहिलं. दोन टक्के कराचे स्वतंत्र हेड निर्माण केले तर अग्नीशमन विभाग सक्षमीकरणाला हातभार लागेल.

- शंकर मिसाळ, अग्नीशमन विभागप्रमुख