मनपाच्या पाच स्विकृत नगरसेवकांसह अधिकार्‍यांना नोटीसा

मनपाच्या पाच स्विकृत नगरसेवकांसह अधिकार्‍यांना नोटीसा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केलेल्या पाच जणांच्या निवडी बेकायदेशीर असून, या नियुक्तांमध्ये निकषांचे पालन झालेले नसल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत करण्यात आला आहे. नगरचे सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर यांनी ही याचिका दाखल केली असून, खंडपीठाने राज्याच्या प्रधान सचिवांसह मनपाचे महापौर, आयुक्त, नवे स्वीकृत नगरसेवक असे मिळून नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याची सुनावणी 13 जुलैला होणार आहे.

मनपाने केलेल्या सर्व पाचही नियुक्त्या केवळ समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या अशासकीय संघटनेचे पदाधिकारी याच एकमेव निकषात केल्या आहेत. त्यामुळे अन्य निकषांचे पालन झालेले नाही, असे म्हणणे शेख यांनी याचिकेत मांडले आहे. महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवक म्हणून संग्राम शेळके व मदन आढाव (दोन्ही शिवसेना), विपुल शेटिया व राजू कातोरे (दोन्ही राष्ट्रवादी) व रामदास आंधळे (भाजप) यांची नियुक्ती केली आहे.

पहिल्या महासभेने अपात्र ठरवलेल्या पाच सदस्यांना नंतरच्या महासभेने पात्र ठरवून त्यांची निवड केल्याने याविरोधात तसेच मनपा आयुक्तांवर शिस्तभंग कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रधान सचिवांकडे शेख यांनी तक्रार दाखल केली होती. नियमबाह्य झालेल्या या नियुक्त्या रद्द करून दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

त्याची सुनावणी 15 जुन रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे यांच्या समोर झाली. न्यायालयाने नऊ जणांना नोटीसा काढल्या आहेत. याचीकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. नितीन गवारे यांनी बाजु मांडली. त्यांना सहायक म्हणून अ‍ॅड. एस. व्ही. सलगर व अ‍ॅड. झेड. ए. फारुकी यांनी काम पाहिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com