मनपाच्या महापौरपदी शेंडगे, उपमहापौरपदी भोसले बिनविरोध

प्रथमच शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र
मनपाच्या महापौरपदी शेंडगे, उपमहापौरपदी भोसले बिनविरोध

अहमदनगर|Ahmedagar -

महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे (Rohini Shendge) तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले (Ganesh Bhosale) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या ऑनलाईन सभेत दोघांचेच एकमेव अर्ज असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

नगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) स्थापन झाल्यापासून प्रथमच शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीची मदत घेऊन शिवसेनेचा महापौर झाले आहे. आयुक्त शंकर गोरे, निवडणुकीचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, नगर विकास अधिकारी एस. बी. तडवी हे उपस्थित होते.

कोरोना काळात महापौर आणि उपमहापौर यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी भोसले यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला संंधी दिली. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप यांच्यासह सर्व नगरसेवकांनी दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून पुढील काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. शहरात प्रलंबीत असलेली विकासकामे करण्यावर भर देणार आहे.

- रोहिणी शेंडगे (महापौर)

नगर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा मानस आहे. हरित नगर करण्याची संकल्पना घेऊन आपल्याला आगामी काळामध्ये वाटचाल करायची आहे. तसेच महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना सुद्धा शिस्त लावण्याची गरज असून त्यासाठी कठोर पावले उचलणार आहे. राहिलेले कामे तातडीने पूर्ण करण्यास प्राधन्य देणार आहे.

- गणेश भोसले (उपमहापौर)

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी

सभेचे ऑनलाईन आयोजन केल्याने महापालिकेत गर्दी नव्हती. सभागृहामध्ये जिल्हाधिकारी यांच्यासह मोजके अधिकारी व महापौर, उपमहापौर पदाचे उमेदवार हजर होते. इतरांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. निवडीपूर्वी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये राडा झाल्यामुळे शहर पोलिसांनी महापालिकेत मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर तारकपूर येथील एका खाजगी हॉटेलच्या बाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भगव्या गुलालाची उधळण करत फटाके फोडले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com