वीज आकडे बहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम

दोन दिवसांत २ हजार ६४४ जणांच्या अनधिकृत जोडण्या हटवल्या
वीज आकडे बहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम

अहमदनगर | Ahmednagar

वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योग जगताकडून वाढलेली वीजमागणी यामुळे महावितरणची सध्याची उच्चतम मागणी नोंदवली गेली आहे. मात्र कोळशाची कमतरता यामुळे वीज निर्मितीत घट झालेली असून आपत्कालीन भारनियमन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहीत्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. यानुसार आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध अहमदनगर मंडलात धडक मोहीम हाती घेतली असून, २१ व २२ एप्रिल या दोन दिवसांत २ हजार ४०५ आकडे काढून त्यांच्या केबल जप्त करण्याचे काम केले आहे. तसेच २३९ वीज चोराविरुद्ध कारवाई केली आहे. या प्रयत्नांमुळे दोन दिवसात सदर वीज वाहिन्यांवरील ताण कमी होऊन वीजभार हलका होण्यास मदत झाली आहे.

या मोहीमेमध्ये कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० एम्पिअरच्या पुढे असलेल्या विद्युत वाहिन्या अहमदनगर मंडळात आहेत त्यांना लक्ष्य करुन गुरुवारी व शुक्रवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली होती. यामध्ये अनाधिकृतपणे कृषीपंपाला जोडलेले केबल आदी जप्त केले आहेत . घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा यावेळी काढण्यात आले आहेत. नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी अभियंते यांचेसह विविध पथकामध्ये अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे.

यामध्ये अहमदनगर मंडळातील अनधिकृतपणे वीज तारांवर आकडे अथवा हुक टाकणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये संगमनेर विभागात हुक टाकणाऱ्या ८९८ कृषी तर १२९ इतर वर्गवारीचे ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ कृषी व ५१ इतर ग्राहकांचा समावेश आहे. श्रीरामपूर विभागात हुक टाकणाऱ्या ३५३ कृषी तर ३७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४ इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर शहर विभागात हुक टाकणाऱ्या ३१४कृषी तर १२२ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ४० कृषी व५२इतर ग्राहकांचा समावेश आहे. अहमदनगर ग्रामीण विभागात हुक टाकणाऱ्या १७१ कृषी तर १०५ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ८२इतर ग्राहकांचा समावेश आहे. कर्जत विभागात हुक टाकणाऱ्या२२२ कृषी तर ५४इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५ इतर ग्राहकांचा समावेश आहे. असे एकूण अहमदनगर मंडळात हुक टाकणाऱ्या कृषी ग्राहकांमध्ये १९५८ तर ४४७ इतर ग्राहक असून वीजचोरी करणारे ५२ कृषी व १८७ इतर असून अशाप्रकारे यामोहिमेत एकूण २ हजार ६४४ अनधिकृत जोडण्या काढण्यात आलेल्या आहेत.

तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून मागणीमध्ये वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. खुल्या बाजारात विजेचे दर प्रचंड महागडे आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनाधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.

मुख्यालय पातळीवरून सर्व वीजवाहिन्याचा आढावा घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने अतिभारीत असलेल्या वीज वाहिन्यांची माहिती क्षेत्रीय स्तरावरील संबंधित अधीकाऱ्यांकडे पाठवली आहे. रोहीत्रांवरील अतिरिक्त भार कमी न झाल्यास सबंधितांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या मोहीमेमुळे वीज यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. तसेच या मोहीमेमुळे अनावश्यकपणे वाढणारी विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होणार आहे . तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Stories

No stories found.