चार लाखांहून अधिक बालकांना मिळणार पोलिओचा डोस

17 जानेवारीला लसीकरण मोहिम
चार लाखांहून अधिक बालकांना मिळणार पोलिओचा डोस

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यातील शुन्य ते 5 वयोगटातील चार लाखांहून अधिक बालकांना 17 जानेवारी 2021 रोजी पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील

पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी घेतला. एकही बालक लसिकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईल टीमच्या माध्यमातून लसीकरण नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम पूर्वतयारी संदर्भात बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप नीचीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. दादासाहेब भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यात शुन्य ते 5 वर्षे वयोगटातील 4 लाख 38 हजार 866 बालकांना पोलिओची मात्रा दिली जाणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 3 लाख 75 हजार 937, महानगरपालिका क्षेत्रातील 46 हजार 220 आणि नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील 16 हजार 669 बालकांना पोलिओचा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला असून आज त्यासंदर्भात जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com