ऑनलाईन फसवणूकीत गेलेले पैसे आले परत

सायबर पोलिसांची सतर्कता; तात्काळ संपर्क साधल्याने शक्य
ऑनलाईन फसवणूकीत गेलेले पैसे आले परत

अहमदनगर | Ahmedagar

ऑनलाईन फसवणूक (Online fraud) झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांशी (Cyber ​​police) संपर्क साधला तर फसवणूकीची रक्कम परत मिळते. याचा अनुभव नगरमधील एका व्यक्तीला आला.

मच्छिंद्र शेरकर (रा. अहमदनगर) नावाच्या व्यक्तीचे ऑनलाईन फसवणूकीत 49 हजार 700 रूपये गेले होते. पैसे खात्यावरून गेल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी अर्धा तासात सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्यांना त्यांचे गेलेले पैसे परत मिळून दिले.

अलिकडच्या काळात ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. अनेक मार्गाने फसवणूक केली जात आहे. अशीच फसवणूक मच्छिंद्र शेरकर यांची झाली होती. ऐनीडेक्स अ‍ॅप डाऊनलोड केल्याने शेरकर यांच्या खात्यातून 49 हजार 700 रूपये काढून घेतले. त्यांनी आर्धा तासात सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजित अरकल, राहुल गुंड्डू, उमेश खेडकर, सविता खताळ यांनी तांत्रिक तपास करून शेरकर यांची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत मिळून दिली.

नागरिकांनी ऑनलाईन फसवणूकीपासून सावध राहावे, फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास फसवणूकीची रक्कम मिळण्यास मदत होते. यामुळे फसवणूकीपासून सावध राहण्याबरोबर तक्रार तात्काळ दाखल करावी, असे आव्हान पोलिसांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com