
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
नगर शहरातील प्रमुख़ व्यापारी बँक असलेल्या अहमदनगर मर्चंट्स बँकेची निवडणूक अखेर होणार असल्याचे गुरुवारी ( दि.16)दुपारी अर्ज माघारीची मुदत संपल्यावर स्पष्ट झाले. ही निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा होती. पण ती अखेरपर्यंत चर्चाच राहिली. एक जागा बिनविरोध झाली असल्याने राहिलेल्या 16 जागांसाठी 30 जण निवडणूक रिंगणात होते.
यापैकी फक्त 8 जणांनी माघारीच्या अंतिम दिवशी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता 16 जागांसाठी 22 जण निवडणूक रिंगणात आहेत. येत्या 26 फेब्रुवारीला या निवडणुकीचे मतदान व 27 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
नगर मर्चंट्स सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वसाधारण वर्गातून 12, अनुसूचित जाती व जमाती 1, महिला 2, इतर मागासवर्गीय 1,भटक्या विमुक्त जाती व जमाती तथा विशेष मागास प्रवर्ग 1 अशा एकूण संचालक मंडळाच्या 17 जागा आहेत. मतदानासाठी एकूण 17 हजार 508 मतदार पात्र आहेत.31 जानेवारीपर्यंतच्या मुदतीत 35 जणांनी 63 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
अनेकांनी एकापेक्षा अनेक अर्ज केले होते. त्यानंतर 35जणांपैकी तीन जणांचे चार अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे रिंगणात 31 उमेदवार होते. यापैकी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून विद्यमान संचालक सुभाष बायड यांच्या विरोधात कोणी प्रतिस्पर्धी उभा राहिला नसल्याने ते बिनविरोध झाले आहेत व राहिलेल्या 16 जागांसाठी 30 जण रिंगणात होते. यापैकी आठजणांनी माघार घेतली. त्यामुळे आता रिंगणात 22 जण राहिले आहेत.
गांधींच्या याचिकेची उत्सुकता
बँकेच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संतोष फुलचंद गांधी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांनी फेटाळल्यावर त्यांनी सहकार आयुक्त कार्यालयातील अप्पर निबंधक शैलेश कोथमिरे यांच्याकडे अपिल केले होते. तेथेही ते फेटाळण्यात आल्याने गांधी यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. तेथे गुरुवारी दुपारपर्यंत काय निर्णय होतो, याची उत्सुकता बँकेच्या वर्तुळात होती. पण त्यांच्या याचिकेची सुनावणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या याचिकेच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.
यांची माघार, बाकी रिंगणात
निवडणुकीतील सर्वसाधारण मतदारसंघात उमेदवारी दाखल केलेल्या शरद गोपीनाथ भांबरे, मीना संजय चोपडा, नरेंद्र नेमीचंद लोहाडे, महावीर मोतीलाल पोखरणा व सौरभ हेमराज बोरा या पाच जणांनी तर महिला राखीव मतदारसंघातील मीना संजय चोपडा व निकिता महावीर पोखरणा यांनी आणि इतर मागासवर्गीय मतदारसंघातून शिवराम उत्तम भगत अशा आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
त्यामुळे आता रिंगणात राहिले आहेत हे उमेदवार : बँकेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील 12 जागांसाठी मोहनलाल बरमेचा, संजयकुमार चोपडा, अजय मुथा, हस्तीमल मुनोत,किशोर मुनोत, आनंदराम मुनोत, संजय बोरा, किशोर गांधी, प्रमोद अष्टेकर, अनिलकुमार पोखरणा, संजीव गांधी, कमलेश भंडारी, हरिष भांबरे, अमित मुथा असे 14 जण रिंगणात आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात सुभाष बायड यांचा एकमेव अर्ज राहिला असल्याने ते बिनविरोध झाले आहेत. महिला राखीव मतदार संघाच्या दोन जागांसाठी मीना मुनोत, प्रमिला बोरा, श्रुतिका मगर असे तीन उमेदवार आहेत. इतरमागासवर्ग मतदार संघाच्या एका जागेसाठी विजयकुमार कोथिंबिरे व हरिष भांबरे असे दोन उमेदवार तर विजा-भज-विमाप्र मतदार संघाच्या एका जागेसाठी सुभाष भांड, प्रमोद अष्टेकर व निशांत दातीर असे तीनजणांचे अर्ज राहिले आहेत. दरम्यान, अहमदनगर मर्चंट्स सहकारी बँकेच्या निवडणुकीत संस्थापक-अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने यंदा दोन नवीन चेहरे दिले आहेत. बँकेतील सत्ताधार्यांचे विरोधक म्हणूनच परिचित असलेले माजी नगरसेवक संजय चोपडा यंदा सत्ताधार्यांकडून उभे असल्याने त्यांचे ते नवे उमेदवार ठरले आहेत. तसेच आदेश चंगेडिया यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता व्यक्त केल्याने त्यांच्याऐवजी यंदा सत्ताधार्यांनी संस्थापक-अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांचे चिरंजीव किशोर मुनोत यांना रिंगणात उतरवले आहे.