अहमदनगर मर्चंटस बँकेच्या तीन संचालकांसह अधिकार्‍याची चौकशी

10 कोटींची फसवणुक प्रकरण || जबाब नोंदविले, कागदपत्रेही घेतली ताब्यात
अहमदनगर मर्चंटस बँकेच्या तीन संचालकांसह अधिकार्‍याची चौकशी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील अहमदनगर मर्चंटस को-ऑप. बँकेच्या 10 कोटींच्या फसवणुक प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सोमवारपासून चौकशीला सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी बँकेच्या तीन संचालक व एक अधिकार्‍याची चौकशी करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यांच्याकडून काही कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याचे या गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी सांगितले.

अहमदनगर मर्चंटस बँकेने नगरमधील एका उद्योजकाला 10 कोटींचे कर्ज दिल्याचे सांगितले जाते. मात्र, हे कर्ज वितरण करताना कोणतेही तारण घेतले नसल्याचेही समजते. संबंधित उद्योजकाने या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेने दोन वर्षांपूर्वी म्हणजे 9 नोव्हेंबर 2020 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पण दोन वर्षात या गुन्ह्याचा तपासच पोलिसांनी केला नाही. त्यामुळे येथील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन अहमदनगर मर्चंटस बँकेसंदर्भात दाखल गुन्ह्याची चौकशी व्हावी तसेच याबँकेच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या मागणीची दखल घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार आता एमआयडीसी पोलिसांनी हा दाखल गुन्हा चौकशीसाठी अजेंड्यावर घेतला असून, यासंदर्भात अहमदनगर मर्चंटस को-ऑप.बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना समजपत्र पाठवले होते व त्यात बँकेच्या 12 संचालकांची व चार अधिकार्‍यांची नावे नमूद करून या सर्वांना रोज सहा या प्रमाणे सलग तीन दिवस एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी हजर ठेवण्याचे आदेश सहायक निरीक्षक आठरे यांनी दिले होते.

त्यानुसार सोमवारपासून चौकशीला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी बँकेच्या तीन संचालकांसह एका अधिकार्‍याने चौकशीसाठी हजरी लावली होती. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदवून घेतले. काही कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. अजून दोन दिवस आणखी संचालक व अधिकार्‍यांची चौकशी केली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com