नगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही

मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत माहिती
नगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही

मुंबई | Mumbai

अहमदनगर येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही संचालनालयात सुरू असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात मंत्री देशमुख यांनी ही माहिती दिली. अहमदनगर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांमार्फत नियुक्त 4 प्राध्यापकांच्या तज्ज्ञ समितीने अहमदनगरला भेट देऊन त्या बाबतचा प्राथमिक अहवाल 27 जानेवारी 2022 रोजी संचालनालयास सादर केला आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान 20 एकर जागेची आवश्यकता आहे त्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रूग्णालयाचे एकूण 7.46 एकर जागा उपलब्ध असून रूग्णालयापासून 10 कि.मी. अंतराच्या परिसरामध्ये निकषानुसार आवश्यक जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. तसेच तज्ञ समितीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली असल्याचे मंत्री देशमुख यांनी उत्तरात म्हटले आहे.

उक्त शक्याशक्यता पडताळणी अनुषंगाने अहमदनगर येथे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांनुसार 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 खाटांचे रूग्णालये निर्मिती करण्याबाबतचा सर्वसमावेशक प्रस्ताव शासनास मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही संचालनालय सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com