Nagar Market
Nagar Market
सार्वमत

नगरमधील बाजारपेठा अखेर 14 दिवसांसाठी बंद

आडतेबाजार, दाळमंडईत कंटेन्मेंट तर कापडबाजार, गंजबाजार, तेलीखुंटला बफर झोन

Nilesh Jadhav

अहदमदनगर (प्रतिनिधी) - आडतेबाजार परिसरात रविवारी करोना बाधितांची संख्या वाढली आणि नगर शहरातील संपूर्ण बाजारपेठेवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे गंडांतर आले. सोमवारपासून सर्व बाजारपेठा 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. आडतेबाजार परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

नगर शहरात करोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच वाढत आहे. तोफखाना, सिद्धार्थनगर, नालेगावातील वाघ गल्ली येथे बाधितांची संख्या मोठी आहे. तेथील रुग्ण येत असतानाच शनिवारी आडतेबाजार परिसरात एक रुग्ण आढळला. यामुळे व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी रविवारपासून तीन दिवस आडतेबाजार, दाळमंडई ही बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरूही झाली.

मात्र रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालात आडतेबाजार परिसरात आणखी चार रुग्ण आढळल्याने ही बाजारपेठ तीन दिवसच नव्हे, तर 14 दिवस बंद राहील, असे संकेत मिळत होते. झालेही तसेच. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सोमवारी आडतेबाजार, दाळमंडई, रामचंद्र खुंट, कोंड्यामामा चौक, कोठला व गंजबाजारचा काही भाग याची पाहणी केली.

या पाहणीनंतर हा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून महापालिकेने जाहीर केले. तसे आदेश जारी करतानाच परिसरातील रस्ते पत्रे ठोकून बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारी जोरदार पाऊस झाल्याने या कामात काहीसा अडथळा आला, मात्र रात्री उशिरापर्यंत या भागातील बरेच रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे आडतेबाजार तीन दिवस बंद ठेवण्याच्या व्यापारी असोसिएशनचा निर्णय असला तरी आता हा संपूर्ण परिसरच 14 दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.

कोठला, ब्राह्मण कारंजा, अंबिका हॉटेल, आडतेबाजार, गंजबाजाराचा काही भाग, पाचलिंग गल्ली, दाळमंडई, ग्राहक भांडार चौक, मंगलगेट आदी परिसर कंटेन्मेंट झोन तर झेंडीगेट, सुभेदार गल्ली, नालबंद खुंट, गंजबाजार, मोचीगल्ली, सारडा गल्ली, कापडबाजार, शहाजी रोड, तांबटकरगल्ली, तेलीखुंट पॉवर हाऊस, नालामस्जिद, तेलीखुंट, सर्जेपुरा चौक, बेलदार गल्ली, जे. जे. गल्ली, कोंड्यामामा चौक, कोठला हा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com