VIDEO : नगरमध्ये मराठा समाज आक्रमक! शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राजकीय नेत्यांचे बोर्ड फाडले

VIDEO : नगरमध्ये मराठा समाज आक्रमक! शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात राजकीय नेत्यांचे बोर्ड फाडले

अहमदनगर | प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकार जाणिवपूवर्क मराठा आरक्षण आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. पाच दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण करणार्‍या मनोज जरांगे पाटील यांच्या सरकार लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला असून मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण द्या, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत रविवारी नगरमध्ये सकल मराठा समाजाच्या तरुणांनी प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरीय महामंडळ अधिवेशात काही काळ गोंधळ घालत व्यासपिठावर असणार्‍या राजकीय नेत्यांचे फलक फाडत ते काही उतरवण्यास भाग पाडले.

नगर-औरंगाबाद रोडवरील एका खासगी लॉनमध्ये रविवारी प्राथमिक शिक्षक संघाचे महामंडळ सभा, जिल्हा गुरूमाऊली आणि सदिच्छा मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. या सभेला शनिवारी मंत्री केसरकर यांचा दौरा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आला होता. मात्र, रविवारी सकाळी ते खासगी कारणामुळे सभेला येणार नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, मंत्री येणार नसल्याने राज्यातील शिक्षक नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा, सभा सुरू झाली होती. याचवेळी साधरण 11.30 वाजता 20 ते 25 सकल मराठा समाज बांधव याठिकाणी दाखल झाले. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत, आरक्षणाच्या मागणी करत राज्य सरकार विरोधात घोषणा देत शिक्षकांच्या कार्यक्रमातील व्यासपिठावर धाव घेतली. यावेळी काही काळ शिक्षक नेत्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली आणि अचानक काही आंदोलकांनी व्यासपिठा मागे असणार्‍या सुमारे 50 फुटी राजकीय नेत्यांचे फालक फाडण्यास सुरूवात केली. यावरून काही काळ एकच गोंधळ झाला.

यावेळी आंदोलन करणार्‍या सरकारचे फलका उतरवा, शिक्षकांच्या सभेला आमाचा विरोध नाही. आरक्षणाकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्हाला मदत करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यामुळे उपस्थित शिक्षक नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करत राजकीय व्यक्तींचे फोटो असणारे फलक उतरवले आणि आंदोलनकर्ते शांत झाले आणि निघून गेले. सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या गोंधळानंतर शिक्षकांची सभा सुरू झाली. यावेळी मराठा आंदोलनकर्ते गोरख दळवी यांनी सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार यांना इशारा देत आता मराठा तरूणांनी फलक फाडले आहे. उद्या तुमचे कपडे फाडण्यास पुढे पाठीमागे पाहणार नाही, असा इशारा दिला. यावेळी गजेंद्र दांगट, विक्रांत दिघे, स्वप्नील दगडे, मयूर वांढेकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते. एमआयडीसी पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता.

अंत पाहू नका - दळवी

आंदोलनानंतर गोरख दळवी म्हणाले, सभेच्या ठिकाणी शनिवारी रात्री येऊन शिक्षक नेत्यांना सभेला राजकीय नेत्यांना न बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. आजच्या सभेला नेते गैरहजर राहिले. मात्र, त्यांचे फोटो व्यासपिठावरील फलकावर होते. मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर साखळी उपोषण करत आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. तर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र, सरकार अंत पाहत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा परिणाम वाईट होतील, जरांगे यांना काही झाल्यास राज्यात अराजकता निर्माण होईल, असा इशारा अजय महाराज बारस्कर यांनी यावेळी दिला.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com