
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अहमदनगर, माळशेजघाट, मुरबाड, कल्याण या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी राज्य शासनाने 50 टक्के निधी देण्याची तयारी दाखवून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर करावा, अशा मागणीचा ठराव प्रवासी संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
प्रवासी संघटनेची 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत सेक्रेटरी अनिल कुलकर्णी यांनी प्रास्तविक व स्वागत केले. खजिनदार विठ्ठलराव कर्डिले यांनी सन 2020 ते 2021 चे वार्षिक जमाखर्च व ऑडीट रिपोर्ट सादर केले. त्यास मंजुरी देण्यात आली.
कल्याण मुरबाड ते अहमदनगर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले व अतिमहत्त्वाच्या पिंकबुकमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी 937 कोटी खर्च अपेक्षीत करण्यात आला होता; परंतु तत्कालीन लोकप्रतिनिधींचा इच्छाशक्तीचा अभाव यामुळे ही मागणी आजपर्यंत दुर्लक्षीत झाली आहे. हा रेल्वेमार्ग नगर जिल्ह्यातील पारनेर, टाकळीढोकेश्वर यांना जोडला जाणार आहे. ठाणे-पुणे-अहमदनगर या जिल्ह्यातील विकासाला संजीवनी देणारा ठरणार असल्याने तसेच सध्या पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने या नवीन रेल्वेमार्गाला कॉडलाईनद्वारा जोडून पुढे अहमदनगरहून बीड, परळी, हैद्राबाद, विशाखापट्टणम रेल्वेमार्गाला जोडल्यास मुंबई-हैद्राबाद हे शहर जवळचे राहील व जलद मालवाहतूकद्वारा मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न रेल्वेला उपलब्ध होईल. हा ऐतिहासीक मार्ग व्हावा, असे रेल्वेच्या तज्ञ अधिकार्यांचे मत आहे.
राज्य सरकारने खर्चाचा 50 टक्के निधी जर दिला तर या दुर्लक्षीत रेल्वेमार्गाला पुन्हा चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेसह या मार्गावरील सर्व राज्य शासनातील मंत्री यांना निवेदन सादर करण्याचे ठरले. संघटीतरित्या रेल्वे मंत्रालय व राज्य शासनाने पाठपुरावा केल्यास जिल्ह्याला उपयुक्त रेल्वेमार्गाची निर्मिती होणार आहे. विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले जाणार आहे.
या सभेत संघटनेच्या सदस्या स्वयंसिध्द युवा रोजगार संस्थेच्या कु.अनिता आहेर यांना उद्योग व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल समता सहकार उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.माधवी राजे तसेच संघटनेचे ऑडीटर चार्टर्ड अकाउंटंट सौ.मानसी नाईक यांचा सत्कार विठ्ठलराव कर्डिले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष प्रा.डॉ. गोरख बारहाते यांनी आभार मानले.