लम्पी बाधितांची संख्या आता 30 हजार 556

मृतांची संख्या आता दोन हजारांच्या टप्प्यात
लम्पी बाधितांची संख्या आता 30 हजार 556

अहमदनगर (प्रतिनिधी)

दररोज लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढती आहे, शिवाय दैनंदिन 50 ते 100 दरम्यान जनावरांचा मृत्यू होतांना दिसत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनाने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ उपक्रमाला गती देण्यासाठी ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. गावोगावी लम्पीदूतही नेमले जाणार आहेत.

दरम्यान, शुक्रवारी जिल्ह्यातील लम्पी बाधितांचा आकडा 30 हजार 556 झाला असून मृत जनावरांची संख्याही देखील 1 हजार 941 झाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. सुनील तुंबारे व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी लम्पी रोखण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.

विविध खाते प्रमुखांना तालुके ठरवून दिले असून ते संबंधीत तालुक्यात दौरे करत आहे. दुसरीकडे 100 टक्के लसीकरणही पूर्ण झालेले आहे. मात्र, तरीही लम्पीचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आता गावोगावच्या ग्रामपंचायती, सामाजिक संघटना, सहकारी संस्थांनी याकामी पुढे येवून शेतकर्‍यांमध्ये गोठा स्वच्छ ठेवून माशा, गोचीड, डास नष्ट करून लम्पीरोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीची पाऊले उचलली आहेत.

आता जिल्ह्यात ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून गावातील गोठ्यांची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार केली जाणार आहेत. पशुसंवर्धन अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि सरपंच यांच्या सल्ल्याने गावातील पशुपालकांनी माहिती व पशुपालनाही आवड असणारे दोन किंवा आवश्यक लोकसंख्येनुसार दोनपेक्षा अधिक स्वयंसेवकांची लम्पीदूत म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तर तहसीलदार हे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, सहायक गटविकास अधिकारी हे सदस्य असणार आहेत. तसेच पशुधन विस्तार अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्थाप्रमुख, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, सर्व सरपंच, सर्व पोलिस पाटील, यांची सभा घेवून तालुकास्तरावर माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहिम राबविण्यासंदर्भात तसेच जैव सुरक्षा विषयक प्रतिबंधाची माहिती देण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालवधीत लम्पीचा जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यातील 220 गावात लम्पीचा शिरकाव झाला असून बाधितांची संख्या 30 हजार 556 झाली आहे. सध्या 600 ते 900 दरम्यान दररोज नव्याने लम्पी बाधित समोर येत आहे. तर 20 हजार 776 जनावरांनी लम्पीवर मात केली असून तरी 1 हजार 941 जनावरांचा लम्पी रोगाने बळी घेतलेला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com