नगर भविष्यातील लॉजिस्टीक कॅपीटल

केंद्रीय मंत्री गडकरी || जिल्हा देशाच्या नकाशावर झळकणार
नगर भविष्यातील लॉजिस्टीक कॅपीटल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरकरांच्या स्वप्नातील उड्डाणपूल आता प्रत्यक्षात साकारला आहे. लवकरच उत्तर-दक्षिण भारताला जोडणार्‍या 80 हजार कोटींच्या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेच्या कामाला सुरुवात होणार आहे. 141 किलोमीटरचा एक्सप्रेस हायवे नगर जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामुळे नगर जिल्हा खर्‍याअर्थाने देशाच्या नकाशावर झळकणार आहे. उत्तर आणि दक्षिणेतील राज्यातून जाणार्‍या वाहतुकीमुळे नगर जिल्हा भविष्यातील लॉजिस्टीक कॅपीटल (माल वाहतूक प्रबंधन राजधानी) होणार असल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

जिल्ह्यातून जाणार्‍या या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेजवळ ग्रोथ सेंटर, लॉजिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर, स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज उभी केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य सरकारमधील मंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घ्यावा, असा सल्ला मंत्री गडकरी यांनी दिला. नगर शहरातील स्टेशन रस्त्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 331 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते डिजीटल पद्धतीने झाले. यावेळी पालकमंत्री विखे यांच्यासह खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, आ. राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री होण्याआधी जिल्ह्यात 202 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग होते. मात्र, आता त्यात 869 किलोमीटरने वाढ होऊन ते 1 हजार 71 किलोमीटरचे झाले आहेत. ही वाढ 431 टक्के आहे, असे सांगून गडकरी म्हणाले, मागील 8 वर्षात 36 कामे हाती घेतली आहेत व यातील 700 किलोमीटरची 13 कामे पूर्ण झाली असून 24 कामे प्रगतीपथावर आहेत. 381 किलोमीटरची 6 कामे प्रस्तावित आहेत. राज्यात एकूण 30 हजार कोटींची रस्ता कामे होत असून, यात सर्वाधिक 17 हजार 228 कोटींची कामे नगर जिल्ह्यात होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नगरचा उड्डाणपूल हा महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण झाला आहे व आता 80 हजार कोटींचा उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे साकारला जात आहे. यामुळे उत्तरेतून दक्षिणेकडे जाताना मुंबई वा पुणे मार्गाने होणारी वाहतूक तिकडे न जाता ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे मार्गे वळणार असल्याने पुण्या-मुंबईचा वाहतुकीचा ताण कमी होईल व दुसरीकडे नगर जिल्हा देशाच्या नकाशावर येईल. या ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेची नगर जिल्ह्यातील लांबी 122 किलोमीटर आहे. त्यामुळे नगर जिल्हा औद्योगिक विकासाला चालना देणारे लॉजिस्टीक कॅपीटल होणार आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. दरम्यान, माळशेज ते नगर हा 161 किलोमीटरचा रस्ता 500 कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रिटीकरण करण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली.

नागपूरला जसा मी फ्लोटींग फाऊंटन सुरू केला, त्याच पद्धतीने उड्डाण पुलानिमित्त लाईट अँड साऊंड शो नगरला सुरू केल्यास उड्डाणपुलामुळे जीवन सुसह्य झालेल्या नगरकरांचे जीवन आनंदीही होईल, असे आवाहन मंत्री गडकरी यांनी पालकमंत्री विखे व खा.डॉ. सुजय विखे यांना केले.

शेतकरी उर्जादाता व्हावा

शेतकरी हा अन्नदाता आहेच, पण तो आता उर्जादाता व्हावा, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, साखर कारखान्यांनी आता साखर कमी व इथेनॉल जास्त उत्पादित केले पाहिजे. आपण 16 लाख कोटींची इंधन आयात करतो, पण आता बायो इथेनॉलवर चालणार्‍या व 40 टक्के वीज तयार करणार्‍या गाड्या आल्या आहेत. बायो हायड्रोलिक गाडी तर पाण्यापासून ऑक्सिजन तयार करते. त्यामुळे इथेनॉल निर्मितीतून शेतकरी उर्जादाता होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राठोडांसाठी दुसर्‍यांदा दिलगीरी

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालकमंत्री विखे यांनी केले. यावेळी त्यांनी उड्डाणपुलाचे श्रेय माजी खा. (स्व.) दिलीप गांधी व खा. डॉ. विखे यांना दिले. (स्व.) गांधींनी या पुलाचा पाया घातल्याने त्यांच्यासमोर मी नतमस्तक होतो, असेही आवर्जून सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व लष्कराचे जनरल नरवणे यांचेही त्यांनी आभार मानले. मात्र, कार्यक्रम संपत आल्यावर अचानक ते पुन्हा बोलण्यासाठी आले व उड्डाणपुलासाठी नगरचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड यांचेही मोठे योगदान असून, त्यांचीही आठवण आल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे त्यांचा उल्लेख राहिल्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असे ते म्हणाले.

फडणवीसांची महाविकासवर टीका

या कार्यक्रमासाठी व्हीडीओ संदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवला होता. यात बोलतांना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात विकास कामे खोळंबली होती, पण आता महाराष्ट्राच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे व नगर जिल्ह्यात मी जेव्हा येईल, त्यावेळी यावर सविस्तर बोलेन, असे स्पष्ट करून नवा उड्डाण पुल नगरच्या विकासाला गती देईल. स्थानिक व विभागीय वाहतूक वेगवेगळी होईल. अपघातांचे प्रमाण कमी होईल, वाहतूक कोंडी दूर होईल, इंधन बचत होईल व प्रदूषणही कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

खासदारांची राजकीय प्रगल्भता

उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या भाजपमय कार्यक्रमात शहराचे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचे अवघडलेपण भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनीच दूर केले. पाठीमागे उभे असल्याने दीप प्रज्वलनाची संधी आ. जगतापांना मिळाली नाही व उड्डाणपुल प्राधिकरणाने त्यांचा सत्कारही केला नाही. मात्र, हे लक्षात आल्यावर खा. डॉ. विखे यांनी स्वतः आ. जगतापांना फुलांचा बुके देऊन सत्कार केला. तसेच काही वेळाने स्वतः त्यांना गडकरींकडे घेऊन जाऊन त्यांची ओळखही करून दिली. त्यानंतर गडकरींनीही भाषणात विखे-जगताप यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले. दरम्यान, या कार्यक्रमास शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महापौर रोहिणीताई शेंडगे थोड्या उशिरा आल्या व त्यांनी गडकरींचा सत्कार केला. पण त्यांना व्यासपीठावर बसण्यास जागा नसल्याने खा. विखेंनी त्यांना आपल्या खुर्चीवर बसवले व ते स्वतः पाठीमागे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले. खासदारांनी दाखवलेली राजकीय प्रगल्भता उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

‘त्यांचे’ अनुकरण करावे

नगरच्या उड्डाणपुलासाठी माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केला व विद्यमान खा. डॉ. सुजय विखे यांनी मागे लागून हे काम पूर्ण करवून घेतले. युटिलिटी शिफ्टींग व डिफेन्स परवानगीसारख्या अनेक अडथळ्यांवर मात करून खा. विखे व स्थानिक आ. संग्राम जगताप यांनी पुलाचे काम मार्गी लावले व निधी उपलब्ध करून देत उड्डाणपुलाच्या खांबांवर श्रीशिवछत्रपतींचा सुंदर इतिहास रेखाटला आहे. या दोघांचे अनुकरण सगळीकडे होण्याची गरज आहे, असे कौतुक करून गडकरी म्हणाले, पुणे-औरंगाबाद सहा पदरी नवीन मार्गासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे व हा रस्ता नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाला जोडला जाणार आहे. तसेच शिरूर-पुणे मार्गावर वाघोली-लोणीकंद-शिक्रापूर-रांजणगाव येथे वाहतूक कोंडी होत असल्याने येथे 56 किलोमीटरला 18 लेन असलेला दुमजली उड्डाण पूल केला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com