बीड गाजवणारे नगर एलसीबीचे कारभारी

आहेर यांनी स्वीकारला पदभार || गुन्हेगारांना लगाम घालण्याचे आवाहन
बीड गाजवणारे नगर एलसीबीचे कारभारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाची शाखा म्हणून ओळख असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी दिनेश आहेर यांच्या रूपाने एक ‘दबंग’ अधिकारी मिळाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. यापूर्वी त्यांनी बीड एलसीबी चांगलीच गाजवली असल्याने ते नगर एलसीबीला निश्चित न्याय देतील यात शंका नाही. दरम्यान मंगळवारी दुपारी निरीक्षक आहेर यांनी पदभार स्वीकारला.

एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक अनिल कटके यांची जळगाव येथे बदली झाली होती. दरम्यान त्यांना मुदतवाढ मिळणार अशीही चर्चा होती. परंतु अधीक्षक ओला यांनी त्यांना नियंत्रण कक्षात पाठवून दिनेश आहेर यांना संधी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एलसीबीला नवीन निरीक्षक मिळतील, अशी चर्चा होती. त्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते. अनेकजण या स्पर्धेत असताना अधीक्षक ओला यांनी निरीक्षक आहेर यांच्यावर विश्वास दाखविला.

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा पोलीस दलाची महत्त्वाची शाखा म्हणून ओळखली जाते. पूर्वी चांगले काम केलेल्या आणि अनुभव असणार्‍या अधिकार्‍यांना याठिकाणी संधी मिळते. पोलीस निरीक्षक आहेर यांनी यापूर्वी बीड एलसीबीला धडाकेबाज कामगिरी करून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कुख्यात गुन्हेगार पिन्या कापसे याने केलेल्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत त्यांनी त्याला अटक केले होते. एक शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून निरीक्षक आहेर यांची पोलीस दलात ओळख आहे.

त्यांच्या याच कार्याची दखल घेत अधीक्षक ओला यांनी त्यांना संधी दिली आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी व गुन्हेगारांना लगाम घालण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. मोक्का, तडीपार, एमपीडीए आशा कारवाया करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न निरीक्षक आहेर करतील यात शंका नाही.

दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी सोमवारी रात्री उशीरा बदल्यासंदर्भात आदेश काढले. यामध्ये निरीक्षक कटके यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. गेल्या महिन्यात बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक विजय करे यांची कर्जत पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. त्यांची बदली आता नियंत्रण कक्षात करण्यात आली असून त्यांच्या जागी जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांची बदली करण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण येथून जिल्ह्यात बदलून आलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज अहिरे यांना संगमनेर तालुका तर रामकृष्ण जगताप यांना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल

निरीक्षक आहेर हे 2016 मध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह वाकी शिवारात मिळून आला होता व अपघाताचा बनाव तयार करण्यात आला होता. परंतु घटनास्थळी अतिशय बारकाईने पाहणी करून सदर मृतदेहाची ओळख पटवून गुन्ह्यात तीन आरोपींना निरीक्षक आहेर यांनी तात्काळ अटक केली होती. योग्य प्रकारे तपास करून न्यायालयात आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘सर्वोत्कृृष्ट अन्वेषण पदक’ दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com