जलयुक्तच्या कामाची चौकशी करा, टाका जेलमध्ये

जलयुक्तच्या कामाची चौकशी करा, टाका जेलमध्ये

'या' माजी मंत्र्याचे राज्य सरकारला खुले आव्हान

अहमदनगर | Ahmedagar

मागील 14 महिन्यांपासून जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाची चौकशी करणार असल्याची भिती दाखविली जात आहे. चौकशी, चौकशी काय करता, तुमच्याकडे दोन ते तीन विभाग आहेत. करा चौकशी, टाका जेलमध्ये, आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे खुले आव्हान भाजपचे सरचिटणीस तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला दिले.

बावनकुळे दोन दिवसापासून नगर दौर्‍यावर आहे. रविवारी ते नगरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, माजी आ. शिवाजी कर्डिले, भाजपाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, नगर शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, युवामोर्चाचे सत्यजित कदम आदी उपस्थित होते. तत्कालीन भाजप सरकारने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाची चौकशी महाविकास आघाडी सरकारने लावली आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या जलसंधारण कामात सहाशे कोटींचा भ्रष्टचार झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, राज्य सरकारने जलयुक्त शिवारातून झालेल्या कामाची सीआयडी, एसीबी मार्फत चौकशी करावी, आमचे खुले आव्हान आहे. चौकशीच्या नावाने आम्ही कामे कधी बंद ठेवली नाही. पैसे दुसरीकडे वळविले नाही. मात्र या सरकाने कामे बंद करण्याचे पाप केले आहे. 15 दिवस विधीमंडळाचे आधिवेशन घेतले असते तर जलसंधारण खात्याचा पूर्ण भ्रष्टचार बाहेेर आला असता, त्याचा पूर्ण अभ्यास देवेंद्र फडवणीस यांनी केला होता. परंतु, करोनाच्या नावाखाली या सरकारने केवळ दोन दिवस अधिवेशन घेऊन पळवाट काढली आहे. तुमच्यात धम्मक आहे तर सर्व अधिकार वापरून चौकशी करा, आमच्या सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून मंजुर केलेली कामे रद्द करायची आणि आणि तो पैसा जलसंधारण खात्यात आणून सहाशे कोटींचे भ्रष्टचार केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक खात्यामध्ये भ्रष्टचार आहे. मागच्या दीड वर्षापासून वैधनिक विकास महामंडळ बंद केले. महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले असल्याची टिका बावनकुळे यांनी केली. ज्या ठिकाणी कमिशन भेटेल तेवढे काम या सरकारकडून केले जाते. तीन पक्षाचे सरकार एकत्र आणण्यासाठी झारितील शुक्रचार्याने जसे प्रयत्न केले तसे मराठा, ओबीसी आरक्षण मिळून देण्यासाठी करायला पाहिले असेही बावनकुळे यांनी म्हटले. तीन महिन्यात ओबीसीना आरक्षण दिले तर स्वागत करू, नाही दिले तर सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.