
अहमदनगर (प्रतिनिधी)
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उच्चभ्रू सोसायटीमध्ये तसेच बाजारपेठेतील व्यापार्यांनी आपल्या आस्थापनांसमोर रोडच्या दिशेने किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर कॅमेरे बसविण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांकडून केले जात आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या ‘एक सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांसाठी’ या संकल्पनेतून आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन कोतवाली पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एखादी मोठी घटना तसेच घरफोडी, चोरी किंवा मोठा गुन्हा घडल्यास गृहनिर्माण सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे चर्चिला जातो. काही मोठे बंगले तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सुरक्षेबाबत नागरिक उदासीन असल्याचे दिसून येतात. सोसायटीत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी टाळाटाळ केली जाते. मात्र, एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला नंतर उपाय नसतो. त्यासाठी व्यापार्यांनी दुकानांमध्ये कॅमेरे बसवणे आवश्यक आहे आणि त्यामधील किमान एक कॅमेरा रोडच्या दिशेने बसवावा तसेच पार्किंग आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बस आवश्यक आहे.
गुन्हा घडला तर त्याचा छडा लावण्यासाठी याचा पोलिसांना चांगला फायदा होतो. सीसीटीव्ही यंत्रणेमुळे सोसायटीच्या आवारात काही गैरप्रकार घडत असेल, तर त्याची दखल लगेच घेतली जाते. चोरी, घरफोडी सारख्या घटनांना आळा बसतो. तसेच निर्मनुष्य भागातून जात असताना लुटण्यासारखे प्रकार काही वेळा घडताना दिसतात. अशावेळी सीसीटीव्ही यंत्रणा परिसरात असल्यास याचा पोलिसांना फायदा होतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले आहे.