अहमदनगर : डायग्नोस्टिक सेंटरने दडविली माहिती

शाकीर शेख । आरोग्य संचालकांना पत्र
अहमदनगर : डायग्नोस्टिक सेंटरने दडविली माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) - आरटीपीसीआरद्वारे निदान केलेल्या कोवीड रुग्णांची माहिती महापालिका प्रशासनास न देता डायग्नोस्टिक सेंटरने ती दडविली. दुसर्‍या रुग्णांची तपासणी करण्यापूर्वी सीटी स्कॅनिंग मशीन निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असताना ते केले जात नाही, परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणार्‍या नगर शहरातील डायग्नोस्टिक सेंटरच्या संचालकांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी राज्याच्या आरोग्य संचालकांकडे केली आहे.

राज्यासह देशात कोरोना महामारीने धुमाकुळ घातला आहे. जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या रोज वाढतेच आहे. अ‍ॅन्टीनेज किंवा आरटीपीसीआर चाचणीद्वारे कोवीडचा संसर्ग झाला की नाही, हे कळते. मात्र त्याचा रिपोर्ट येण्यात दोन-चार दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीकोनातून अनेक डॉक्टरांनी संशयितांना एचआरसीटी करण्याचा आग्रह केला जात आहे. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये केलेल्या एचआरसीटी रिपोर्टमध्ये बर्‍याच आजारात कोवीड सदृश्य बाबी दिसून आल्या. अन्टीजन किंवा आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह असणे गरजेचे असतानाही त्याचा रिपोर्ट येण्यापूर्वीच संबंधितांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. यातून जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली झाली.

एचआरसीटीद्वारे कोविड-19 निदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीची नावे, संपर्क क्रमांक, पूर्ण पत्ता आदी माहिती संबंधित निदान केंद्र डायग्नोस्टीक सेंटर यांनी स्थानिक प्रशासनास देणे बंधनकारक आहे. परंतू त्यांनी महानगरपालिकेस तशी कोणत्याही प्रकारची माहिती आजपावेतो सादर केली नसल्याचे समजते. महानगरपालिकेनेही स्वतंत्र कक्ष तयार केलेला नाही. मनपाने डायग्नोस्टीक सेंटरकडून माहिती प्राप्त करून घेऊन कोविड 19 रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती गोळा करून त्यांची कोविड-19 चाचणी करून कार्यवाही करणे आवश्यक असताना आजपर्यंत अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी मोठ्या संख्येने रुग्ण दगावलेले आहेत. तसेच डायग्नोस्टीक सेंटरधारक त्यांच्याकडे एचआरसीटी करण्यासाठी आलेल्या रुग्णाचे निदान करण्यापूर्वी संबधित सीटी स्कॅनिंग मशीन धारकाने निर्जंतुकीकरण करून घेऊन मगच तपासणी करणे आवश्यक असताना, तशी प्रक्रिया होत नसल्याने अनेक व्यक्ती कोरोना रुग्ण नसतानाही त्या कारणामुळे त्यांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व डायग्नोस्टीक सेंटरधारकांविरोधात त्यांनी आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केल्यामुळे कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर अहमदनगर महानगरपालिका आयुक्त व वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांनीही संदर्भीय अधिसुचनेचे अनुपालन करुन अंमलबजावणी करणे बंधनकारक असताना आपले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्यामुळे त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी तसे आदेश पारीत करावे अशी मागणी शाकीर शेख यांनी केली आहे.

टेक्निशियनच पाहतो कारभार!

डायग्नोस्टीक सेंटरमध्ये रेडीओलॉजिस्ट उपस्थित असणे आवश्यक असताना एकाच रेडीओलॉजिस्टच्या नावाने अनेक रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनिंग मशीनचा कारभार पाहिला जात आहे. एचआरसीटी करुन रेडीओलॉजिस्टला ऑनलाईन माहिती कळविली जाते. यानंतर अहवाल तयार करुन स्कॅन केलेल्या स्वाक्षरीने अहवाल दिला जात आहे. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलने प्रयोगशाळावाल्यांना चाचणी अहवाल देताना मूळ स्वाक्षरी करून अहवाल देणे अभिप्रेत केलेले आहे. मात्र त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन सर्रासपणे स्कॅन केलेल्या स्वाक्षरीने अहवाल दिले जात असल्याचा आरोप शेख यांनी पत्रात केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com