जिल्ह्यात 29 व 30 मार्चला उष्णतेची लाट

हवामान खात्याचा अलर्ट जारी, खबरदारी घेण्याचे आवाहन
जिल्ह्यात 29 व 30 मार्चला उष्णतेची लाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. 29 मार्चनंतर राज्यात उष्णतेची दाहकता आणखी वाढण्याची शक्यता आहे. 29 आणि 30 मार्च रोजी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

मध्य आणि वायव्य भारतात अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहत आहे. तर काही भागात उष्णतेचा चटका वाढला आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढली आहे. तर मार्च एंडला विदर्भासह पश्चिम राजस्थान, दक्षिण हरियाणा, पश्चिम मध्य प्रदेशात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

येत्या तीन दिवसांत पश्चिम हिमालयातील काही भागासह गुजरातमधील काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. तर पुढील चार ते पाच दिवसात पश्चिम मध्यप्रदेश, विदर्भ आणि राजस्थानात उन्हाचा चटका वाढणार आहे. त्यानंतर 29 ते 31 मार्च दरम्यान महिन्याच्या शेवटी दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सूर्य आग ओकण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदला आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.