
अहमदनगर (प्रतिनिधी)
नगर (Ahmednagar) शहरातील फेज टू पाणी (Phase Two Water Scheme) योजना गेल्या १२ वर्षापासून प्रलंबित आहे. या योजनेच्या कामाची सुरुवातच चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठेकेदाराला टेंडर देवून झाली. त्यात लोकप्रतिनिधीने वारंवार हस्तक्षेप करत कामात केलेले बदल, जवळच्याच कार्यकर्ते व नातेवाईकांना दिलेले काम यामुळे नगरचा पाणीप्रश्न सुटण्यापेक्षा अधिक बिकट झाला आहे.
फेज टू टू योजनेत लोकप्रतिनिधी, मनपाचे अधिकारी, कार्यकर्ते व ठेकेदाराने संगनमताने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संबंधितांकडून जनतेच्या केलेल्या लुटीची वसुली करावी, अशा मागणी भाजपचे (BJP) माजी शहराध्यक्ष वसंत लोढा (Vasant Lodha) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना केली आहे.
लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नगर शहराचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी २०१० साली फेज २ योजना मंजूर करून निधी उपलब्ध करू दिला होता. महानगर पालिकेचे तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांनी २१ जून २०१० रोजी त्यास मंजुरी देत कार्यारंभ केला. परंतु पाणी योजनेच्या कामाचा कोणताही अनुभव नसलेल्या तापी कंपनीला ७९ कोटी रुपयांचे टेंडर मध्ये वाढ करत वाढीव दराने १९६ कोटीला दिले. या महत्त्वपूर्ण योजनेचे चुकीच्या पद्धतीने टेंडर दिल्या गेल्याने तेथूनच या योजनेचे १२ वाजण्यास सुरवात झाली. जकात वसूलीचे काम करणाऱ्या तापी कंपनीने फेज २ योजनेची पूर्ण वाट लावली आहे. त्यामुळे गेल्या १२ वर्षापासून नगरकरांचा पाणीप्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे भाजपचे तत्कालीन नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती.
फेज २ योजनेचे ११६ कोटी, पाईप लाईन टाकण्यासाठी २० कोटी व अमृत योजनेचे १०७ कोटी असा एकूण २४० कोटी एवढा मोठा निधीतील विकास कामे झालेली असताना नगर शहराचे पाणीप्रश्न आहे तसाच आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी, मनपा संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधीचे जवळचे कार्यकर्ते व ठेकेदार यांनी संगनमत करत या सर्व कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तीन वर्षात काम पूर्ण करण्याचा कालावधी होता, मात्र गेले १२ वर्ष रखडलेल्या या योजनेच्या इस्टीमेट मध्ये लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करत वेळोवेळी बरेच बदल केले आहेत. अत्यंत दिरंगाई झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. इस्टीमेट प्रमाणे डीआय पाईप टाकण्या ऐवजी साधे एचडीपीई पाईप टाकण्यात आले आहेत. रस्त्यांची खोदाई ही नियमा प्रमाणे झालेली नाहीये. खोदलेले रस्ते दुरुस्त न केल्याने त्यामुळे नगरकरांचा त्रास अधिक गंभीर झाला आहे.
पूर्ण शहराला एक दिवस आड पाणी तेही केवळ एक तासच मिळत आहे. पाण्याला फोर्स नसल्याने सर्व नागरिकांना पाण्याची मोटार लावूनच पाणी भरावे लागत आहे. तसेच नळधारकांच्या घरापर्यंत नळ जोडणी मनपाने करणे अपेक्षित होते. मात्र ते कामही शहराच्या लोकप्रतिनिधीच्याच नातेवाईकाला देण्यात आले आहे. त्याने मनमानी कारभार करत एकेका जोडणीसाठी ३ ते १० हजार रुपये नागरिकांकडून घेत जनतेची करोडो रुपयांची लुट करत आहे. जनतेची ही लूट थांबवावी. शहराच्या लोकप्रतिनिधीने नगरकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवत डोळ्यात धूळफेक केली आहे. केंद्र व राज्य सरकारची उघडउघड फसवणूक केली आहे. तरी या योजनेच्या माध्यमातून झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्या संबधितांकडून जनतेच्या पैशाची केलेल्या लुटीची वसुली करावी. यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सर्व पुरावे माझ्या कडे आहेत. चौकशीअंती ते सादर करू, असे निवेदनात लोढा यांनी म्हटले आहे.