व्हीआरडीईचे स्थलांतर रद्द होईपर्यंत पाठपुरावा

दिलीप गांधी । पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांना धाडले पत्र
व्हीआरडीईचे स्थलांतर रद्द होईपर्यंत पाठपुरावा

अहमदनगर (प्रतिनिधी) -

व्हीआरडीईसारखी संस्था नगरमधून स्थलांतरित होणे हे आपले दुर्दैव आहे. या संस्थेचे स्थलांतर होवू नये यासाठी मी पुढाकार घेणार

असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे तातडीने पत्र व्यवहार करत आहे. स्थलांतर रद्द होईपर्यत शांत बसणार नाही. संस्थेतील कर्मचार्‍यांनी घाबरून जावू नये, यातून नक्की मार्ग निघेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.

व्ही.आर.डी.ई मुळे नगरचे नाव संपूर्ण जगात गेले आहे. ही संस्था नगरची शान आहे. हजारो नागरिकांची रोजीरोटी या संस्थेवर अवलंबून आहे. शहरासह पंचक्रोशीतील अनेक गावे व्ही.आर.डी.ई वर अवलंबून आहेत. अशी महत्वपूर्ण व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था नगरमधून स्थलांतरित होण्यास स्थगिती मिळावी या मागणीचे निवेदन व्ही.आर.डी.ई मधील विविध कर्मचार्‍यांच्या युनियनच्या पदाधिकार्‍यांनी दिलीप गांधी यांना देवून या प्रश्नात लक्ष घालण्याचे आवाहन केले.

यावेळी कर्मचारी कार्य समितीचे सहसचिव आर.बी. खरमाळे, उपाध्यक्ष व्ही.एम.वायकर, व्ही.आर.डी.ई कामगार युनियनचे अध्यक्ष शंकर पगार, सचिव सलीम अहमद, कीर्तीरथ कुरेशिया, व्ही.आर.डी.ई एसटीए असोशिएशनचे अध्यक्ष पी.जी.पराशर, व्ही.आर.डी.ई अ‍ॅडमीन असोशिएशनचे अध्यक्ष आर.एल.स्वामी, ड्रायव्हर असोशिएशनचे अध्यक्ष ई.जी.घोडे उपस्थित होते.

हजारोंची पोशिंदा असलेली ही संस्था बंद पडणे नगरसाठी हानिकारक आहे. औद्दोगिक विकासाला खिळ बसेल. 20 ते 25 वर्षापासून येथे सरकारी सेवा देणार्‍यांचा कर्मचार्‍यांना बेरोजगार व्हावे लागेल. त्यामुळे नगर वासियांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

आत्मनिर्भर भारतमध्ये योगदान

व्ही.आर.डी.ई संरक्षण संस्था भारताच्या सशस्त्र सेनेला लढण्यासाठी लागणारी शास्त्रे, रणगाडे, मिसाईल लाँचर, बुलेटप्रुफ वाहने, प्रोटोटाईप, ड्रोनइंजिन आदी उपलब्ध करून देते आहे. भारताला आत्मनिर्भर करण्यात व्हीआरडीईचा मोलाचा वाटा आहे. व्ही.आर.डी.ई मध्ये सध्या वैज्ञानिक, अधिकारी, व कर्मचारी मिळून सुमारे 500 नागरिक कार्यरत आहेत. तसेच 400 स्थानिक कर्मचारी कराराने व 100 शिकाऊ कर्मचारी कार्यरत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com