
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगरच्या नव्या उड्डाण पुलावरून नेहमीसुसाट वेगाने धावणार्या छोट्या-मोठ्या गाड्यांना रविवारी सायंकाळी वारंवार ब्रेक लावावा लागत होता. पुणे रस्त्यावरील कायनेटीक चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम उड्डाण पुलावरील वाहतुकीवरही झाला होता व तीन किलोमीटर अंतराच्या या पुलावर शेवटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात काही अॅम्ब्युलन्सही होत्या.
नगरला 15 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला उड्डाणपूल आता बाहेरगावच्या वाहनांच्या चांगलाच अंगवळणी पडला आहे. औरंगाबादहून पुण्याकडे वा पुण्याहून औरंगाबादकडे जाणारी बहुतांश छोटी व अवजड वाहने आता उड्डाण पुलावरून दिमाखात व वेगात मार्गक्रमण करतात. त्यामुळे उड्डाण पुलाखालील शहरांतर्गत रस्त्यांची वाहतूक कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडीही जवळपास बंद झाली आहे. अशा स्थितीत रविवारी (दि.18) सायंकाळी 5 वाजल्यापासून उड्डाण पुलावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. कायनेटीक चौकात वाहतूक कोंडी झाल्याने उड्डाण पुलावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे सांगण्यात आले.
मालधक्का वाहनामुळे कोंडी
रेल्वे मालधक्क्यावरून अनेक अवजड वाहने एकापाठोपाठ एक अशी स्टेशन रस्त्याने पुणे रस्त्यावरील कायनेटीक चौकात आल्याने येथे वाहनांची कोंडी झाली. शहर वाहतूक पोलिसांनी तातडीने धाव घेत वाहनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. पण दौंडकडूनही वाहतूक सुरू होती तसेच पुण्याकडून नगरकडे येणारी वाहतूकही असल्याने चारही बाजूने वाहनेच वाहने या चौकात दिसत होती. परिणामी, उड्डाणपुलावरून पुण्याकडे जाणार्या वाहतुकीचा वेग मंदावला होता. रविवारची सुट्टी संपवून नोकरी-व्यवसायानिमित्त पुण्याकडे जाणार्या वाहनांची संख्या जास्त होती. त्यात रविवारी लग्नतीथी ही असल्याने ही परतीची वाहने ही उड्डाण पुलामार्गे मार्गस्थ होत होती. त्यामुळे उड्डाण पुलावर वाहनेच वाहने दिसत होती. काही वाहनांवरील लालदिवे तसेच अॅम्ब्युलन्सचे दिवेही चमकत होते. तब्बल दोन ते तीन तासांनी रात्री आठच्या सुमारास वाहतूक कोंडी थोडी कमी झाल्यावर उड्डाण पुलावरील वाहनांनी नेहमीचा वेग पकडला.