
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलाचे (Ahmednagar Flyover) काम मार्गी लागले. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुलाही झाला. पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय (Political) चढाओढही पाहायला मिळाली. मात्र, दुसरीकडे हा उड्डाणपूल महापालिकेसाठी (Ahmednagar Municipal Corporation) डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी भूसंपादन व इतर कामांसाठी राज्य सरकारने 52 कोटी रूपये मंजूर केले होते. मात्र, त्यापैकी 17.63 कोटी रूपये अद्यापही शासनाने दिलेले नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मात्र इतर कामांच्या बिलांपोटी पैसे जमा करण्यासाठी मनपाकडे (Ahmednagar Municipal Corporation) तगादा सुरू केला आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरातील उड्डाणपूल (Ahmednagar Flyover) प्रत्यक्षात उतरला. उड्डाणपुलासाठी प्रस्तावित जागांच्या भूसंपादनासह जलवाहिन्या, टेलिफोन, महावितरणच्या वाहिन्यांचे स्थलांतर आदी विविध कामांसाठी 52 कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा सर्व 52 कोटींचा निधी राज्य सरकार देणार, अशी घोषणा करून तसे आदेशही पारित झाले.
मात्र, या निधीतील 17.63 कोटी रूपये शासनाने अद्यापही महापालिकेला अदा केलेले नाहीत. उड्डाणपुलाच्या कामाव्यतिरिक्त त्याच ठेकेदारामार्फत इतर कामे पूर्ण करून घेण्यात आली. त्याचा खर्च मनपाकडून अदा केला जाईल, असेही ठरले. शासनाकडून मिळणार्या निधीतूनच हा खर्च केला जाणार आहे. मात्र, शासनाकडून 17.63 कोटी रूपये मनपाला अद्यापही मिळालेले नसल्याने ही देणी रखडली आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority) महापालिकेला पत्र देऊन उड्डाणपूलाव्यतिरिक्त इतर कामांच्या बिलापोटी 4.59 कोटी रूपये तत्काळ अदा करावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, शासनाकडून उर्वरित निधीच मिळालेला नसल्याने व महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) आधीच आर्थिक अडचणीत असल्याने हा खर्च करायचा कोठून असा सवाल मनपासमोर आहे.