
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
येथील उड्डाणपुलावर चांदणी चौकाजवळ धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात चारचाकी वाहनातील दोघांचा मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सदर वळणावरच उन्हामुळे डांबर वितळून रस्ता काही प्रमाणात खचला असून, याठिकाणीच वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुफीयान समीर शेख (वय 28, रा. कोंढवा, पुणे) व रिहान अस्लम शेख (वय 20, रा. कोंढवा, पुणे) अशी मयतांची नावे आहेत. मयत व त्यांचे इतर चार सहकारी असे सहा जण इनोव्हा कारमधून पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जात होते. नगर शहरातून उड्डाणपुलावरून जात असताना चांदणी चौकापुढे असलेल्या तीव्र व धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली.
अपघातग्रस्त कार सुमारे 100 मीटर उड्डाणपुलाच्या दुभाजकाला घासत पुढे जाऊन थांबली. कारमधील दोघा गंभीर जखमींना त्यांच्या नातेवाईकाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघे मयत झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या खबरीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, उड्डाणपुलावर धोकादायक वळणामुळे सातत्याने अपघात होत आहेत. याच धोकादायक वळणावर रस्ता खचण्यास सुरूवात झाली आहे. त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.