बनावट एनओसी प्रकरण : पोलीस उपअधिक्षकांकडून तपासात चालढकल

तथाकथित एजंटांना अभय
चोरी
चोरी

अहमदनगर (प्रतिनिधी)

बनावट एनओसी प्रकरणाचा तपास वरीष्ठ अधिकार्‍यांकडे सोपविल्याने तपासात गती येईल, अशी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरल्याचे चित्र आहे.

आर्मी स्टेशन हेडकॉर्टरमधील कर्मचारी, पोलिसांनी अटक केलेले आरोपी व एनओसी मिळवणारे भूखंडधारक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेले, तसेच या प्रकरणातील प्रमुख संशयित असलेल्या तथाकथित एजंटांची चौकशी करण्यात तपासी अधिकार्‍यांकडून चालढकल केली जात असल्याने तपास पूर्णपणे थंडावल्याचे चित्र आहे. दरम्यान, स्टेशन हेडकॉर्टरकडून माहिती मिळविण्यातही पोलीस अपयशी ठरत आहेत.

महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात बनावट एनओसी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्याकडे असलेला तपास पोलीस अधिक्षकांनी उपअधीक्षक अनिल कातकाडे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र, त्यांच्याकडे तपास वर्ग झाल्यापासून विनय वराडे या हेडकॉटर मधील माजी कर्मचार्‍याच्या अटकेव्यतिरिक्त तपासात कुठलीही प्रगती झालेली नाही.

महसूल विभागाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये ज्या तीन प्रकरणांमध्ये बनावट एनओसी व कागदपत्रे आढळून आली होती, ती राजा ठाकूर व रोहन धेंडवाल यांनी करून दिल्याचा दावा पोलीस करत आहेत. मात्र, ज्या एजंटांमार्फत भूखंडधारक व या कर्मचार्‍यांची ओळख झाली, ज्यांच्या मार्फत या एनओसी मिळविण्यात आल्या त्यांची चौकशी गेल्या काही दिवसांपासून थांबविण्यात आली आहे. काही बड्या राजकीय व्यक्तींशी संबंधित व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जवळच्या या व्यक्ती असल्याने तपासात मोठा दबाव येत असल्याची चर्चा आहे. परिणामी तपास थंडावल्याचे चित्र आहे.

रोहन धेंडवाल याने बनावट एनओसी साठी वापरलेला लॅपटॉप अद्यापही तपासी अधिकार्‍यांना हस्तगत करता आलेला नाही. याप्रकरणी त्याच्या आईची चौकशी पोलिसांकडून केली जाणार होती. मात्र, अद्यापही चौकशी होऊ शकलेली नाही. सदरचा लॅपटॉप हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, लॅपटॉप मिळत नसल्याने पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com