अहमदनगर (प्रतिनिधी) - राजकीय कुरघोड्यात अडकलेले तपोवन रोड डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार करून घेतले जाईल अशी ग्वाही विरोधी पक्षनेते नगरसेवक संपत बारस्कर यांनी दिले. आ. संग्राम जगताप यांच्यामुळे साडेतीन कोटी रुपये मंजूर झाला असून सतत अडकाठी आणार्या विरोधकांनी रस्त्याच्या दर्जाची चिंता करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

तपोवन रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची सुरूवात झाल्यानंतर बारस्कर यांच्यासह नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक सुनील त्रिंबके, विनित पाऊलबुद्धे, नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, बांधकाम विभागाचे इंजिनिअर रणदिवे, किसन कजबे, खंडू कजबे यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

बारस्कर म्हणाले, तपोवन रोडचे काम कोणत्याही परिस्थितीत दर्जेदार करुन घेणार आहे. या रस्त्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे साडे तीन कोट रुपये मंजूर करुन आणले. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे काम दर्जेदार झाले नसल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आ. जगताप व आम्ही या रस्त्यांचे काम पुन्हा मजबुतीकरण व डांबरीकरण करावे यासाठी पाठपुरावा केल्यानंतर आज या कामाला सुरुवात झाली आहे. भिस्तबाग महालापासून ते औरंगाबाद महामार्गाला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

25 वर्षानंतर सुटला प्रश्न

गत 25 वर्षांपासून तपोवन रोडचे काम रखडले असल्याने या भागाचा दळवळणाचा प्रश्न गंभीर होता. हे काम मार्गी लावण्यासाठी आ. जगताप यांनी प्रयत्न केले असल्यामुळे मोठा निधी प्राप्त झाला. हा रस्ता पाईपलाईन रोडला पर्यायी रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मनमाड ते औरंगाबाद हायवेला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे वाहतुकीचा मार्ग सुखकर होईल. या रस्त्यामुळे या भागाच्या विकासाला व विस्तारीकरणामध्ये भर पडणार असल्याचे बारस्कर यांनी सांगितले.