जिल्ह्यात 3 दिवस यलो अलर्ट

जिल्ह्यात 3 दिवस यलो अलर्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यासह राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत जोरदार गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात सध्या मान्सूनचे ढग दाटून आले असून काही भागात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात थोड्याफार फरकाने पावसाळी वातावरण राहणार आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनारच्या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामध्ये सातारा, पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील डोंगराळ भागात पावसाची शक्यता अधिक असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पिकांचं संरक्षण कऱण्याची जबाबदारी शेतकर्‍यांवर

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून शेतकर्‍यांनी पिकांची काढणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत मान्सूनच्या सरी पुन्हा कोसळणार असल्यामुळे कापणी केलेल्या पिकांचं संरक्षण कऱण्याची मोठी जबाबदारी शेतकर्‍यांवर असणार आहे. अनेक शेतकर्‍यांनी काढणी केलेली पिकं उन्हात वाळवायला सुरवात केली आहे. त्यामुळे अचानक कोसळणार्‍या पावसाच्या सरींमुळे पिकांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत शेतकर्‍यांना सावधानता बाळगावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.