जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

राष्ट्रवादीची मागणी || बुलेट ट्रेनचा पैसा शेतकर्‍यांना द्या
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या महिनांभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पावसाने खरीप पिकासह, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर खरीप हंगामात काढणीला आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन नगर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. आशुतोष काळे, आ. नीलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ.चंद्रशेखर घुले, प्रा. माणिकराव विधाते, संजय कोळगे, वसंत कांबळे, काकासाहेब तापकीर, किसनराव लोटके, प्रकाश पोटे, अमित खामकर, भरत गारुडकर, बाबा गारूडकर, फारुक रंगरेज, शारदाताई लगड, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सरासरी पेक्षाही जास्त पाऊस सुरू असून त्यामुळे तूर, कपाशी, मूग, तूर, सोयाबीन, यासह ऊस व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुरुवातीचा खरिपाचा हंगाम जादा पावसामुळे वाया गेला व बाजरी, सोयाबीन काढणीच्या हंगाम तसेच कापूस वेचण्याची सुरुवातही झाली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला परतीच्या पाऊस उघडीप देत नाही परिणामी बियाणे, खते व मशागतीवर प्रचंड खर्च होऊन शेतकर्‍यांच्या हाती काही उत्पन्न येणार नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

सातत्याने जमिनीत पाणी असल्याने जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी रब्बी हंगामातील पिके घेता येतील की नाही याचीही साशंकता आहे, अशा परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला दिलासा देण्यासाठी तातडीने सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे तातडीने पंचनामे करून एकरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष फाळके यांनी केली आहे. राज्य सरकारने तातडीने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा राष्ट्रवादीच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकर्‍यांना ई-पीक पाहणी सक्तीची करू नये. ग्रामीण भागातील शेतकर्‍याकंडे अद्यापही स्मार्ट मोबाईल नाहीत. ग्रामीण भागात दुर्गम ठिकाणी व डोंगरदर्‍यामध्ये मोबाईलला नेटवर्क नाही.त्यामुळे शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी केलेली नाही. यामुळे सरसकट शेतकर्‍यांचे पिकांचे पंचनामे करावेत व त्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com