अहमदनगरचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करुन श्रीरामपूर जिल्हा करावा

अहमदनगरचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करुन श्रीरामपूर जिल्हा करावा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

क्षेत्रफळाने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा असलेले अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करा. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर निकषाचे आधारे श्रीरामपूर जिल्हा करावा अशी मागणी राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे श्रीरामपूर जिल्हा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

ना. मुश्रीफ हे 1 मे कामगार दिनी अहमदनगर येथे विश्राम गृहावर आले होते. याप्रसंगी लांडगे यांनी त्यांना त्रिभाजन करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जिल्हा विभाजन प्रश्नाची प्राधान्याने सोडवणूक करणार आहे असे आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिले.

योगायोगाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल खाते आहे. आज त्यांचेच अधिपत्याखाली महसूल विभाग देशात प्रथमस्थानी आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी ना.थोरात अहमदनगरचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करतील असा विश्वास लांडगे यांनी व्यक्त केला आहे. या सामाजिक प्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, जिल्ह्यातील ज्येष्ठ महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि नगर विकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना ट्वीटरद्वारे मागणी करणार आहे.

भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती संकट आटोक्यात आणण्यासाठी तातडीने अनेक उपाययोजना आखणे अपेक्षित आहे. याचाच एकभाग म्हणून सन 2021 चे जनगणनेमध्ये अचुकता दाखवावी. या पार्श्वभूमीवर निकषाचे आधारे प्रायोगीक तत्त्वावर कमी खर्च येणारा असलेला श्रीरामपूर जिल्हा पहिल्या टप्प्यात होण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी युध्द पातळीवर एकत्र येतील. आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरचे विभाजन ऐवजी त्रिभाजन करतील अशी अपेक्षा राजेंद्र लांडगे यांनी व्यक्त केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com