नगर जिल्ह्यात पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याचा प्रयत्न करा

खा. सुप्रिया सुळे : ..... तेव्हाच माणूस दुसर्‍यावर टीका करतो
नगर जिल्ह्यात पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याचा प्रयत्न करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुणे जिल्ह्यात आम्ही पर्यटनच्यादृष्टीने विकासाचा प्रयोग करत आहोत. पर्यटनातून मोठा प्रमाणात महसूल मिळू शकतो. नगर जिल्ह्यात देखील ऐतिहासिक वारसा असून नगरच्या भूईकोट किल्ल्यात देशाचा इतिहास आहे. त्यादृष्टीने नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विचार करावा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच ज्यावेळी सर्वजण राष्ट्रवादीला सोडून जात होते. त्यावेळी याच नगर जिल्ह्याने राष्ट्रवादीच्या सहा तरुण आमदारांना निवडून दिले. यासाठी नगरच्या जनतेचे जाहीर आभार त्यांनी मानले.

राष्ट्रवादी भवन येथे खा. सुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पदाधिकारी संवाद मेळावा झाला. त्यावेळी खा. सुळे बोलत होत्या. यावेळी आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे, आ. संग्राम जगताप, आ. नीलेश लंके, आ. किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादा कळमकर, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, सीताराम पाटील गायकर, पांडुरंग अभंग, माजी आ. राहुल जगताप, घनशाम शेलार, अनुराधा आदिक, मंजुषा गुंड, प्रा. माणिक विधाते, अभिजित खोसे यांच्यासह तालुका पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा. सुळे म्हणाल्या, आज राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीवर सातत्याने टीका होत आहे. बाजारात महाविकास आघाडीचे नाणे खपत असल्याने विरोधक टीका करत आहे. राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे उत्तम काम सुरू आहे. महागाईमुळे जनता होरपळत आहे. तेलाचा डबा, पेट्रोल आणि लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे मला घरी फोन करण्याची सोय राहिली नाही. फोन केला की आई म्हणते,‘ तू खासदार आहे ना, मग दिल्लीला जाऊन महागाई कमी करण्यास सांग’, असे सांगते.

यावेळी खा. सुळे यांनी दोन बायकांची आठवण सांगितली. त्यातील एका बाईने तो मोदी आहे ना, म्हणून महागाई आणि गॅसचे दर वाढले. यामुळे महिला गॅसकडून पुन्हा स्वयंपाकासाठी सरपणाकडे वळल्याची मिश्कील टीका केली. माणूस दुसर्‍यावर केव्हा टीका करतो, जेव्हा त्याला स्वत: बद्दल बोलण्यास काहीच नसते. लोक म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि कोविड आला. मी म्हणते आमच्या काळात कोविड आला हे बरे झाले, जेणेकरून आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली.

देवाची आरती करताना एक समाधान आणि आत्मिक शांती लाभत असते. मन चेहरा प्रसन्न असतो. मात्र, राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका करताना खा. सुळे म्हणाल्या, एका व्यक्तीचा चेहरा आरती करताना अस्वस्थ आणि वेदनादायी दिसत होता. हातात आरतीचे ताठ होते पण तोंडातून काहीच निघत नव्हते. स्वत:ची पोरं इंग्रजी शाळेत टाकायची आणि मराठीचा अभिमान सांगायचा. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, या शब्दांत राज ठाकरे यांचा समाचार घेतला. तसेच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष फाळके यांनी जिल्ह्याला आणखी एक मंत्री पद मिळावे, अशी मागणी केली. मात्र, जिल्हाध्यक्ष असल्याने कोण एकाची शिफारस मी करणार नाही. महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड या जिल्ह्यात फिरून महिला संघटन करण्यात कमी पडत असल्याचे दिसत आहे. यात त्यांची घरची अडचण असून त्यांना घरून मोकळीक मिळत नसावी, असे फाळके म्हणाले. युवकांचे संघटन कपिल पवार आणि संजय काळगे चांगले करत आहेत, पण ते आता युवक राहिलेले नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री वेळ देत नाही, अशी पदाधिकार्‍यांची तक्रार आहे. तसेच त्यांची नगरचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची इच्छा नाही. यामुळे खा. सुळे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना सांगून याप्रकरणी निर्णय घ्यावा, अशी मागणी फाळके यांनी केली.

Related Stories

No stories found.