नगर जिल्ह्यावर तीन दिवस पावसाचे संकट

आतापर्यंत 113 टक्के पाऊस
नगर जिल्ह्यावर तीन दिवस पावसाचे संकट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात 6 ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातून वाहणार्‍या प्रवरा नदीत ओझर बंधारा 218 क्युसेस, गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 1614 क्युसेस व जायकवाडी धरणातून 2096 क्युसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे 4521 क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून 2700 क्युसेस, सिना नदीत सिना धरणातून 157 क्युसेस, मुळा नदीस मुळा धरणातून 545 क्युसेस आणि कुकडी नदीस येडगाव धरणातून 450 क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तात्काळ सुरक्षति स्थळी स्थलांतर करावे. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस

काल गुरूवारी नगर जिल्ह्याच्या विविध भागात रिपरिप सुरू झाली होती. दुपारपर्यंत ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पण सायंकाळी नूर बदलला आणि रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यानंतर काहीसा वेग घेतला होता. श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहात्यासह अन्य तालुक्यात पाऊस कोसळत होता. पावसामुळे आधीच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com