'या' तालुक्याला मिळणार जिल्ह्यातील पहिली महिला पायलट होण्याचा मान

'या' तालुक्याला मिळणार जिल्ह्यातील पहिली महिला पायलट होण्याचा मान

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

भारतीय वायुसेनेते अहमदनगर जिल्ह्यातील पहिली महिला फायटर पायलट होण्याचा बहुमान पाथर्डी तालुक्यातील आयुषी नितीन खेडकर हिने पटकावला आहे.

बुधवारी रात्री जाहीर झालेल्या यादीत आयुषीचे नाव आले.यानंतर तिच्या कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आयुषीचे अभिनंदन केले आहे. आयुषी येथील डॉ.नितीन खेडकर व डॉ.मनीषा खेडकर यांची कन्या आहे. ऑगस्ट 2020 ला तिने फायटर पायलट ची परीक्षा दिली होती.त्याचा निकाल काल जाहीर झाला.या परीक्षेत संपूर्ण देशातून 61 जणांची वायुसेनेत निवड झाली असून त्या मध्ये अकरा मुलींचा समावेश आहे.

आयुषीचे इयत्ता 4 थी पर्यंत चे शिक्षण पाथर्डी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून पाचवी ते दहावी चे शिक्षण तिने पुणे येथील ज्ञान प्रबोधनित घेतले.याच काळात देशसेवेत जायचे हे स्वप्न तिने पहिले. बी.टेक.चे शिक्षण पूर्ण केल्या नंतर ती जी. आर.ई.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी तिची अमेरिकेला निवड झाली मात्र देशसेवेतच तिला रस असल्याने अमेरिकेला जाण्याचे टाळत तिने बेंगलोर येथील ए.बी.बी.या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाली.एकीकडे नोकरी करत असतानाच तिने भारतीय सेवेत जाण्यासाठी ज्या परीक्षा द्यावे लागतात त्या साठी खडतर परिश्रम घेतले ही परीक्षा उत्तीर्ण होऊन तिची एकाच वेळेस नौसेना व वायुसेनेत निवड झाली.

शेवटी वायुसेनेत फायटर पायलट होणे तिने पसंत केले. तालुक्यातील शिरसाठवाडी येथील विष्णू शिरसाठ नंतर भारतीय वायुसेनेत महिला वैमानिक होणारी ती नगर जिल्ह्यातील पहिली एकमेव मुलगी. ठरली आहे. येत्या एक सप्टेंबरला ती हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्या नंतर ती वायुदलात फायटर पायलट म्हणून सहभागी होत देशसेवा करणार आहे.

इयत्ता नववीत असताना तिने गुगल सायन्स फेअर या जागतिक स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धेत तिची आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातून निवड झाली व तिला गुगल कंपनीने अमेरिकेहून मेडल पाठवत तिचा सन्मान केला. इयत्ता 11 वी ते 12 चे शिक्षण तिने पेस अकादमीत पूर्ण केले तर त्या नंतर बी.टेक. करण्यासाठी तिने चेन्नई गाठले.याच काळात तिने तायक्वांदो स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून गुवाहटी येथील स्पर्धेत सहभाग नोंदवत कांस्य पदक पटकावले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com