पुरस्कारांसाठी ‘गुरूजीं’ची लेखी परीक्षा पूर्ण

तिघांची ऐनवेळी माघार : सीईंओच्या बैठकीत निवडणार पुरस्कारार्थी
पुरस्कारांसाठी ‘गुरूजीं’ची लेखी परीक्षा पूर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)

कोविडच्या दोन वर्षानंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी शुक्रवारी (दि.27) 40 गुरूजींनी लेखी परीक्षा दिली. या पुरस्कारांसाठी 43 जणांचे प्रस्ताव आले होते.

मात्र, ऐन परीक्षेतून कोपरगाव, राहाता आणि संगमनेरच्या प्रत्येकी एका शिक्षकांनी माघार घेतली. दरम्यान, दोन वर्षापासून जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण रखडलेले असून यंदा चालूू वर्षीसह मागील दोन वर्षाचे असे तिन वर्षाच्या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, लेखी परीक्षनंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समितीसमोर पुरस्कारासाठी प्रस्ताव आलेल्या शिक्षकांची नावे जाणार आहेत. त्याठिकाणी त्यांच्या प्रस्तावाला मिळालेले गुण आणि लेखी परीक्षेत मिळालेले गुण यांची बेरीज करून प्रत्येक तालुक्यात सर्वाधिक गुण मिळविणार्‍या शिक्षकांची त्यात्या तालुक्यातून पुरस्कारसाठी निवड करण्यात येणार आहे.

दरवर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये चढाओढ असते. यासाठी संबंधीत शिक्षकांना वर्षभर प्रयत्न करावे लागतात. गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्तीचा परीक्षेचा निकाल, शाळेसाठी दिलेले योगदान, शाळेसाठी मिळवलेल्या भौतिक सुविधा, शैक्षणिक विषयावर वेगवेगळ्या पातळीवर केलेले स्वतंत्र लिखाण यासाठी शिक्षकांना प्रस्तावात गुण असतात.

यासह तत्कालीन अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी काही वर्षापूर्वी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांसाठी परीक्षा सक्तीची केलेली असून आलेला प्रस्ताव आणि परीक्षेत मिळणार्‍या गुणांवर या पुरस्कारांचे भवितव्य अवलंबून आहे. आता गुरूजींची लेखी परीक्षा झाली असून शिक्षकांच्या प्रस्ताव आणि परीक्षेचे गुण या आधारे जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी शिक्षकांची निवड होणार आहे. ही निवड झाल्यानंतर संबंधीत शिक्षकांची नावे ही विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार असून त्यांच्या मान्यतेने शिक्षकांची निवड जाहिर करण्यात येणार आहे.

चारित्र पडताळणी ऑनलाईन

जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी संबंधीत शिक्षकांना पोलीसांकडील चारित्र पडताळणी आवश्यक आहे. या पडताळणीचा अहवाल आल्यावरच संबंधीत शिक्षकांची नावे पुरस्कारासाठी निश्चित करण्यात येतात. यापूर्वी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग पोलीसांकडे ही पडताळणी करत होता. मात्र, आता ही पडताळणी ऑनलाईन झालेली असल्याने शिक्षक स्वत: ही पडताळणी करून घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com