यंदाचे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

कार्यक्रमाचा मुहूर्त टळला
यंदाचे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विभागीय आयुक्त यांच्या मान्यतेने आणि जिल्हास्तरावर असणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या जिल्हास्तरीय समितीने यंदाच्या जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या शिक्षक पुरस्कारांची निवड जाहीर केली आहे. या प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून उत्तर आणि दक्षिण विभागातून प्रत्येकी एक अशा दोन केंद्र प्रमुखांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे शिक्षक दिनी सोमवार (दि. 5) या पुरस्कारांचे वितरण यंदाही हुकणार असून लवकरच हा पुरस्कारांसह मागील दोन वर्षातील आणि यंदाचा अशा तीन वर्षातील शिक्षकांना एकत्रित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यंदाच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी 14 तालुक्यातून 39 प्राथमिक आणि 4 केंद्र प्रमुखांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. यातील 3 शिक्षक आणि 1 केंद्रप्रमुख यांनी ऐनवेळी माघारी घेतली होती. त्यानंतर जिल्हास्तरावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) आणि केंद्र प्रमुखांच्या समितीने तालुकानिहाय रॅन्डम पध्दतीने आलेल्या शिक्षकांच्या 100 गुणांच्या मुद्देनिहाय पडताळणी केली होती. त्यानंतर याबाबतचा अहवाल पाकिटात बंद करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला सादर केला होता. त्यानंतर जिल्हा पातळीवर संबंधीत शिक्षकांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. अशा प्रकारे 125 गुणांपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वाधिक गुण मिळवणार्‍या शिक्षकांची यादी करून अशा 14 शिक्षकांची यादी पुरस्कार मान्यतेसाठी विभागीय महसूल आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आली होती. त्यास मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा शिक्षक पुरस्कारार्थी शिक्षकांची निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

यांना मिळाले पुरस्कार

जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये अकोले तालुक्यातून संतोष लक्ष्मण सदगीर, अंबड शाळा. संगमनेर तालुक्यातून अशोक विश्वनाथ शेटे, खांडगाव शाळा. कोपरगाव तालुक्यातून सुदाम नारायण साळुंके, गिरमेवस्ती शाळा. राहाता तालुक्यातून भिमराज पोपट शेळके, पिंपरीलोकाई शाळा. श्रीरामपूर तालुक्यातून खान तरन्नूम अब्बास बेलापूर उर्दू शाळा. राहुरी तालुक्यातू विद्या बबन उदावंत, दिघे वस्ती धानोरे शाळा, नेवासा तालुक्यातून सुमन भानुदास तिजोरे, वडाळा बहिरोबा. नगर तालुक्यातून शरद गंगाधर धलपे, काळा मळा शाळा. शेवगाव तालुक्यातून सविता सर्जेराव बुधवंत, गुंफा शाळा. पाथर्डी तालुक्यातून अण्णासाहेब रामभाऊ साळुंके, जिरेवाडी शाळा. पारनेर तालुक्यातून ज्याती दत्तात्रय साबळे, पवार वाडी शाळा सुपा. श्रीगोंदा तालुक्यातून भावना कैलासनाथ मोहिते, मढेवडगाव शाळा. कर्जत तालुक्यातून नवनाथ रामचंद्र दिवटे, माळवदे वस्ती शाळा आणि जामखेड तालुक्यातूूनअनिता विठ्ठल पवार, लटके वस्तीया शिक्षकांची निवड झाली आहे. तर केंद्र प्रमुखांतून बाळासाहेब दत्तात्रय दळवी चास नगर आणि भाऊसाहेब हरी गायकवाड वांबोरी यांची निवड झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com