
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ढगाळ वातावरण, साठलेले पाणी, वाढलेले गवत यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून यामुळे जिल्ह्यात किटकजन्य आणि विषाणूजन्य आजार वाढले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात कोविड प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर कोविडप्रमाणे लक्षणे असणार्या लागण झाल्यानंतर जिवघेण्या ठरणार्या स्वाईन फ्लूने डोकेवर काढले आहे. यामुळे नागरिक हैराण झाले असून खासगी रुग्णालय फूल्ल असल्याचे दिसत आहे. शासकीय आकडेवारीनूसार जिल्ह्यात जानेवारी ते 22 ऑगस्टअखेर डेंग्यूचे 105 तर स्वाईन फ्लूचे 23 रुग्ण सापडले आहेत. मात्र, खासगी रुग्णालयातील चित्र काही वेगळेच आहे.
दरम्यान, आतापर्यंत स्वाईन फ्लूने सात जणांचा मृत्यू झाला असून संगमनेर, कोपरगाव, राहाता, पारनेर व नगर तालुक्यात स्वाईनचे रुग्ण सापडलेले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आकडेवारीनूसार डेंग्यूची 34 आणि खासगी प्रयोग शाळेत केलेल्या तपासणीत एनएस 1 (संशयीत डेंग्यू) 71 रुग्ण समोर आले आहेत. तर स्वाईनची चाचणी महागडी असल्याने लक्षणानूसार उपचार करण्यात येत असून गंभीर होणार्या रुग्णांची स्वाईनची तपासणी करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार निमोणीच्या 100 रुग्णांपैकी तपासणी केल्यास 40 ते 50 रुग्ण हे स्वाईन फ्लूचे सापडू शकतात. तर 30 ते 40 टक्के हे बॅक्टेरीयल निमोणीचे रुग्ण सापडू शकतात. डेंग्यू आजारात विशिष्ट उपचार पध्दती नसली तर लक्षणानूसार उपचार करण्यात येत आहेत.
ताप, तीव्र घसा दुखी आणि खोकला असल्यास स्वाईन फ्लूचा धोका अधिक असल्याने रुग्णांनी वेळ न दवडता तातडीने शासकीय अथवा खासगी उपचार करावेत. विद्यमान परिस्थितीत जिल्ह्यात स्वाईन आणि डेंग्यूमुळे रुग्ण व्हेंटीलेटरपर्यंत पोहण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरिक्षक काही वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. शासकीय आरोग्य सेवत संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन पुण्याला तपासणीसाठी पाठविले जात आहेत. जिल्ह्यात डेंग्यू, स्वाईन फ्लू संसर्गाचा प्रसार अधिक होऊ नये, झाला तर तो आटोक्यात यावा, यासाठी आरोग्य विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. स्वाईन फ्लू रुग्णांचे निदान करण्यासाठी गावागावांतील सर्दी, पडसे व खोकला असणार्या व्यक्तींचे सर्व्हेक्षण केले जात आहे. स्वाईनमध्ये संसर्गाचे गांभीर्य पाहून आरोग्य विभागकडून टॅमी फ्लू हे औषध देण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनूसार स्वाईनचे संगमनेर तालुक्यामध्ये 15 रुग्ण सापडले असून सर्व रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यापैकी 2 रुग्णांचा मृत्य झाला आहे. यातील एका रुग्णांचा मृत्यू नाशिकच्या खाजगी रुग्णालयात तर दुसर्याचा संगमनेर येथे खाजगी रुग्णालयात झाला आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये स्वाईनचे 3 रूग्ण होते. हे तिनही रुग्ण उपचारादरम्यान दगावले आहेत. यात दोन मृत्यू नाशिक येथे खाजगी रुग्णालयात, तिसरा मृत्यू नगर सिव्हील येथे झाला आहे. पारनेर तालुक्यामध्ये स्वाईन 3 रुग्ण होते. यातील एकाचा नगर सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला असून दोघांवर सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. नगर तालुक्यामध्ये स्वाईनचा एक रुग्ण होता. त्याचा उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. राहाता तालुक्यामध्ये एक रुग्ण सापडला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार असून दर चार आणि दहा वर्षांनी हा विषाणू स्वत: बदल करतो. याला म्युटेशन असून म्हणतात. यंदा तशी परिस्थिती असल्याने जिल्ह्यात स्वाईनचे रुग्ण वाढत आहे. तीव्र घसा दुखी सोबत ताप आणि खोखला असल्यास रुग्णांनी काळजी घेवून योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत. सुरूवातीच्या टप्प्यात स्वाईनचे रुग्ण साध्या टॅमी फ्लू गोळीवर बरे होता. मात्र, वेळ वाया गेल्यास रुग्णांची स्थिती गंभीर ते अती गंभीर होण्याचा धोका आहे. यामुळे लक्षण असल्यास तातडीने उपचार घ्यावेत.
सध्या जिल्ह्यात डेंग्यू आणि स्वाईनचे रुग्ण वाढत आहेत. कोविडप्रमाणेच स्वाईनची लक्षणे असल्याने तीव्र घसा दुखी सोबत ताप आणि खोखला असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला आणि त्याच्या आरोग्य चाचण्या कराव्यात. विशेष करून दुर्धर आजार पिडीत, गरोदर महिलांनी काळजी घ्यावी. कोविड नियमांचे पालन करावे, मास्क वापरावेत, सामाजिक अंतर ठेवावे, हात स्वच्छ धुवावे, त्यामुळे स्वाईन फ्लूपासून बचाव शक्य आहे. तर डेंग्यू टाळण्यासाठी दिवसा डास चावणार नाही, याची काळजी घ्यावी, अनावश्यक पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी आणि योग्य आरोग्य सल्ला घ्यावा.
- डॉ. पियूष पाटील, जनरल फिजीशन, अहमदनगर.
डेंग्यू रुग्ण कुठे ?
नगर 3, श्रीगोंदा 5, कर्जत 2, पाथर्डी 2, नेवासा 2, राहुरी 8, श्रीरामपूर 4, राहाता 35, कोपरगाव 10, संगमनेर 22, अकोले 6, पारनेर 5 एकूण 105 डेंग्यू रूग्ण आहेत.