नगर जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व सिध्द करणार

उत्तर नगर जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांची शिर्डीत ग्वाही
नगर जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व सिध्द करणार

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून शिर्डी लोकसभेचा खासदार व उत्तर नगर जिल्ह्यात कमीतकमी चार आमदार निवडून आणून शिवसेनेचे जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व सिध्द करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे माजीमंत्री तथा उत्तर नगरचे संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी दिली.

उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, भरत मोरे, सुहास वहाडणे, संस्थानचे विश्वस्त सचिन कोते, कमलाकर कोते, राहाता तालुकाप्रमुख संजय शिंदे, राजेंद्र पठारे, जिल्हा संघटक विजय काळे, मुकुंद सिनगर, प्रमोद लभडे, अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, कोपरगावचे शिवाजी ठाकरे, दादा कोकणे, दिनेश शिंदे, सुयोग सावकारे, अक्षय तळेकर, अमोल गायके, सुनील परदेशी, सागर लुटे, भागवत लांडगे आदी पदाधिकार्‍यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोलप म्हणाले, आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढविणार आहेे. उत्तर नगर जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती बघता आमचा एकही शिवसैनिक खा. लोखंडे यांच्याबरोबर गेलेला नसून लोखंडे एकटेच गेले आहेत. आता याठिकाणी गटतट राहाणार नाही. नगर जिल्हा हा कट्टर शिवसैनिकांंचा मतदार संघ आहे. खासदारकीसाठी राखीव झाल्याने आणखी घट्ट झाला असून याठिकाणी कोणतीही गद्दारी होणार नाही. शिवसेना संपर्क प्रमुख या नात्याने जिल्ह्यात अजून शिवसेना कशी खोलवर जाईल यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे घोलप यांनी सांगितले.

धनुष्यबाण शिवसेनेकडेच

धनुष्यबाण या चिन्हाबद्दल सांगताना त्यांनी सांगितले, धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेकडेच राहणार असून शिवसेनेचाच विजय होणार आहे. जे फुटले त्यांच्या अजून ठिकर्‍या होतील. शिवसेनेचा वाघ त्यांच्याशी लढत होता. खा. राऊत यांचे तोंड बंद करण्यासाठी भाजपने ईडीची कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com