
गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi
दिल्लीच्या धर्तीवर नगर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद शाळा डिजीटल करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी केले.
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे सोनई शिक्षक मित्र मंडळाच्यावतीने खेडलेपरमानंद येथे आयोजित सन्मान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुनील गडाख म्हणाले की, मी दिल्लीला गेलो असता त्याठिकाणी डिजिटल शाळांची पाहणी केली. त्यावेळी खुप समाधान वाटले. त्या धर्तीवर आपण आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल करणार आहोत. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींची मदत घेतली जाईल. प्राथमिक शिक्षकांनी केलेला सत्कार माझ्यासाठी खुप मोठा असल्याचेही ते म्हणाले.
सुनिल गडाख यांनी सभापती पदाच्या कार्यकाळात शाळाखोल्या देखभाल दुरुस्ती व कंपाऊंडसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे संतोष निमसे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास विकास मंडळाचे उपाध्यक्ष मोहन राशिनकर, शंकरराव कोलते, मुख्याध्यापक विश्वनाथ कुसळकर, मुख्याध्यापक प्रविण एडकेर, पदवीधर शिवनाथ कुसळकर, दत्तात्रय चोथे, बाप्पासाहेब काकडे, प्रशांत वाव्हळ, राजेंद्र गायकवाड, कल्याण नेहुल, गणेश शेलार, राजेंद्र इंगळे, पृथ्वीराज वाघाडे, सोनईचे माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दरंदले उपस्थित होते.