नगर जिल्ह्याला गुलाब चक्रीवादळाचा तडाखा

अनेक ठिकाणी मुसळधार, सोयाबीन, कपाशीची पिके पाण्याखाली, आणखी 24 तास संकट
नगर जिल्ह्याला गुलाब चक्रीवादळाचा तडाखा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सध्या नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. खरं तर हे वादळ निवळले असून, त्याचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय. राज्यात पुढील 48 तासांत या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. नगर जिल्ह्यात आज बुधवारी यलो अलर्ट दिला आहे.

राज्यात पुढील 24 तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून संततधार सुरू आहे. अहमदनगर, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासा, शेवगावसह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने सोयाबीन आणि कपाशी तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी कांदाही भिजला आहे. आगास सोयबीनच्या शेंगा वाळलेल्या आहेत. अशा पिकांना दणका बसला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लहान व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात सोमवारी रात्री कहर माजवला. गेल्या 48 तासात मुसळधार पावसामुळे मराठवाडा विभागात 10 जणांनी जीव गमावला आहे. बीड जिल्ह्यात 3, उस्मानाबाद आणि परभणीत 2, जालना,नांदेड आणि लातूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, मराठवाड्यासाठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. तर, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यात गेल्या 48 तासात 10 जणांनी जीव गमावला आहे. याशिवाय 200 जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात ठिकठिकाणी घरांचं नुकसान झालं आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड जालना आणि हिंगोलीमध्ये पावसामुळं शेतीचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 180 मंडळात 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

मराठवाड्यातील 28 घरं आणि 25 झोपड्यांचं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे औरंगाबादमधील 11,बीडमधील 12, जालना जिल्ह्यातील 5 घराचं नुकसान झालं आहे.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं संपूर्ण मराठवाड्याला फटका बसला आहे. मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेऊन असून नुकसानाचं प्रमाण कमी राहावं यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं जयंत पाटील म्हणाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळं औरंगाबाद शहरालाही फटका बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले.

आणखी एका चक्रीवादळाचा धोका

नाहीसं झालेलं हे गुलाबफ चक्रीवादळ पुन्हा नव्याने जन्म घेण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येतेय. महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे. हे नाव ओमानने दिलेलं आहे. या वादळाच्या निर्मितीसंदर्भात पुढील काही दिवस फार महत्त्वाचे ठरणार आहेत असं सांगितलं जातं आहे.

Related Stories

No stories found.