नगर जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध

लग्न, अत्यंविधीतील उपस्थितीवर बंधन : दहानंतर पहाटे पाचपर्यंत फिरण्यावर बंदी
नगर जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत पुन्हा निर्बंध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोविडचा वाढता संसर्ग पाहता शासनाच्या आदेशानूसार नगर जिल्ह्यात लग्न समारंभात वर्‍हाडी, पाहुणे मंडळी, मंगल कार्यालयातील कर्मचारी यांची उपस्थिती 50 आत ठेवण्याचे,

तसेच अत्यंविधीची उपस्थिती 20 व्यक्तिपर्यंत ठेवण्यासोबत कलम 144 नूसार निर्बंध लावण्यात आले आहे. यासह आज मंगळवार (दि.23) पासून रात्री 10 ते पहाटे 5 दरम्यान अनावश्यक फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 15 मार्चपर्यंत लागू राहणार असून याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनााने सोमवारी काढले आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत (कोविड) करोनाचा संसर्ग वाढत आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी मोठा जनसमुदाय एकत्र येत असल्याने त्या ठिकाणी करोनाचा उद्रेक होण्याचा धोका अधिक आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, लॉन्स या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी 50 आत लोकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. 50 पेक्षा जास्त गर्दी करणार्‍या मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, लॉन्स चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले असून दंडाच्या वसुलीचे आदेशांचा त्यात समावेश आहे.

दरम्यान, रात्री 10 ते पहाटे पाच या दरम्यान अनावश्यक फिरण्यावर निर्बंध आणले असून जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दी नियंत्रित ठेवणे, प्रभावीत भागात आधी लागू असणार्‍या नियमांचे पालन करणे, सर्व प्रकारचे समारंभ, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, सण, यात्रा, जत्रा, उत्सव या ठिकाणी जास्ती जास्त 50 लोक मास्क लावून आणि सामाजिक अंतर ठेवून एकत्र येवू शकतात, असे जिल्हा प्रशासनाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

नगर शहरात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी लॉन्स आणि मंगल कार्यालयाला भेट देवून गर्दी असणार्‍या ठिकाणी कारवाई केली. यामुळे मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, लॉन्स चालकांचे धाबे दणाणले आहे. तसेच यापुढे गर्दी करणार्‍या मंगल कार्यालय, मॅरेज हॉल, लॉन्स चालकांना दंड करण्याचे आदेश काढले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com