
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शेतकर्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना प्रतिक्षा असणार्या मान्सून अखेर नगर जिल्ह्यात दाखल झाला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरीत पहिल्याच दिवशी मुसळधार तर नगर शहर आणि परिसारात भिज पावसाला सुरूवात झाली. यासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मान्सून आगमनापूर्वी जिल्ह्यात काही प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. मात्र, सर्वांना प्रतिक्षा मान्सूनच्या पावसाची होती. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी शहर, देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी व पूर्वेकडील पठार भागांसह आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर येथे वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. नगर तालुक्यातील डोंगरगण, पिंपळगाव या भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला.
तिकडे दारणा आणि गंगापूर धरणाच्या पोणलोटात पावसाच्या हलक्या सरींचे आगमन झालेले आहे. यासह जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, काल दिवसभर नगर शहरातील नागरिक उकाड्याने हैराण होते. मात्र, सायंकाळी भिज आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. यामुळ वातावरणात गारवा निर्माण झाला. रात्री उशीरापर्यंम मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस पडत होता.