शिक्षक बँकेची उद्या ऑनलाइन वार्षिक सभा

शिक्षक बँकेची उद्या ऑनलाइन वार्षिक सभा

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची 102 वी सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने उद्या (रविवारी) सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सलीमखान पठाण यांनी दिली. दरम्यान, संयमी सत्ताधारी आणि आक्रमक विरोध यांच्यामुळे ही सभा कशी पारपडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

शिक्षक बँकेने शतकोत्तर वाटचालीमध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. कायम ठेवीवर अठरा वर्षातील सर्वोच्च असा सव्वा आठ टक्के व्याज दिला असून यावर्षी शेअर्सवर सात टक्के लाभांश प्रस्तावित आहे. मागील वर्षाचा लाभांश रिझर्व बँकेची परवानगी मिळाल्यानंतर सभासदांना दिला जाणार आहे, असे व्हाईस चेअरमन बाबासाहेब खरात यांनी सांगितले. या पंचवार्षिकमध्ये कायम ठेवीच्या रूपाने प्रत्येक सभासदाचा सर्वाधिक आर्थिक फायदा झाला आहे. कोणतेही अनावश्यक खर्च किंवा उधळपट्टी या संचालक मंडळाच्या काळात झालेली नाही. त्यामुळे सभासदांना जास्तीत जास्त कायम ठेवीवर व्याज आणि लाभांश देणे शक्य झाले आहे. रविवारी होणार्‍या सभेमध्ये बँकेच्या सर्व सभासदांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये विद्यमान संचालक मंडळाने कधीही वार्षिक सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. केलेल्या कारभारावर जिल्ह्यातील सभासद खूष असल्यामुळे वार्षिक सभेची आम्हाला चिंता नाही, असे माजी चेअरमन शरद सुद्रिक यांनी सांगितले.

गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड सुरू आहे. यावर्षी करोनामुळे मोठ्या संख्येने सभासद मृत्युमुखी पडले आहेत. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी कुटुंब आधार निधी आणि मयत सभासद कर्ज निवारण निधीमध्ये पोटनियम दुरुस्ती करून सर्व सभासदांना या दोन्ही योजनेचे लाभ देण्यासाठी संचालक मंडळ बांधील आहे. पस्तीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करताना 15 लाख रुपयाची मदत मयतांच्या वारसांना दिली जाते. ही ऐतिहासिक कामगिरी याच पंचवार्षिक मध्ये संचालक मंडळाने अमलात आणली आहे असे माजी चेअरमन साहेबराव अनाप, संतोष दुसुंगे व राजू राहाणे यांनी सांगितले. विद्यमान संचालक मंडळाने पंचवार्षिक काळामध्ये अनेक नवीन योजना सुरू करून जिल्ह्यातील शिक्षक सभासदांचा मान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विरोधक संचालक प्रवास भत्ता व वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च याबाबत चुकीची माहिती देऊन सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी व्हाईस चेअरमन विद्युलता आढाव, अर्जुन शिरसाट, बाळासाहेब मुखेकर,उषाताई बनकर यांनी केला. या सभेत निवडणुक घेण्यास संबंधीचा ठराव संचालक मंडळच मांडणार असल्याची माहिती माजी चेअरमन राजू राहाणे, संचालक किसन खेमनर, गंगाराम गोडे, अनिल भवार, सुयोग पवार यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com