विकास मंडळासाठीही 500 अर्जाची विक्री

रोहकले गटाचे तीन उमेदवारी अर्ज दाखल
विकास मंडळासाठीही 500 अर्जाची विक्री

अहमदनगर (प्रतिनिधी)

पूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची मालमत्ता असणारी आणि त्यानंतर ट्रस्टमध्ये रुपांतर झालेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची निवडणूक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसोबत होणार आहे.

या ट्रस्टच्या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी विक्रमी 500 अर्जाची विक्री झाली असून रावसाहेब रोहकले गटाच्यावतीने तीन उमदेवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहायक सुरेंद्र आढाव यांनी दिली. यासाठी उमेदवारी अर्जाचा शुल्क 100 रुपये आहे.

पूर्वी जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ ही जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची मालमत्ता होती. मात्र बँकिंग कायद्यात बदल झाल्यानंतर बँकेला मालमत्ता धारण करता येत नसल्याने विकास मंडळाचे शिक्षकांच्या उपयोगासाठी ट्रस्टमध्ये रुपांतर करण्यात आले.

मात्र, या ट्रस्टच्या बायलॉजमध्ये विकास मंडळाची निवडणूक प्रक्रिया आणि वेळ कमी करण्यासाठी या मंडळाची निवडणूक ही शिक्षक बँकेच्या निवडणुकीसोबत घेण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे विकास मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. बँकेच्या निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे 17 ते 23 जून या कालावधीत विकास मंडळासाठी उमेदवारी अर्ज घेवून दाखल करण्यात येणार असून येत्या 24 जुलैला मतदान प्रक्रिया पारपडणार असून 25 जुलैला बँकेच्या मतमोजणीसोबत विकास मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, विकास मंडळाच्या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी 500 उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून याठिकाणी सत्ता असणार्‍या रावसाहेब रोहकले गटाच्यावतीने सुनील पवळे यांनी नेवासा सर्वसाधारण, प्रवीण ठुबे यांनी पारनेर सर्वसाधारण तर संजय शिंदे यांनी भिंगार छावणी परिषद सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी देखील बँकेप्रमाणे 10 हजार 706 शिक्षक सभासद असून विकास मंडळासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. जयदिप देशपांडे, त्यांना अ‍ॅड. हराळे आणि त्यांना सहायक म्हणून विकास मंडळाचे व्यवस्थापक सुरेंद्र आढाव हे काम पाहणार आहे.

विरोधकांची टीका

विकास मंडळाच्या उमदेवारी विरोधकांना उमदेवारी अर्ज उपलब्ध करून देण्यास मुद्दामहून उशीर करण्यात आल्याचा आरोप विरोधी मंडळाकडून करण्यात आला. याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहकले गटाच्या पारदर्शी कारभारावर टीका करण्यात आली. विकास मंडळात विद्यमान सत्ताधार्‍यांनी सेवानिवृत्तांसाठी खुर्ची तयार करण्यात आली असून पण पोटनियम दुरूस्त करतांना मागासवर्गीय आणि एनटी प्रवर्गासाठी जागा ठेवण्यात आली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

कोट्यावधीचा भूखंड

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लालटाकी या ठिकाणी विकास मंडळाचा कोट्यावधी रुपयांचा भूखंड आहे. हा भूखंडच शिक्षक संघटना आणि मंडळामधील वादाचा विषय आहे. या भूखंडाचा विकास करून त्याठिकाणी जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या मुलांसाठी वसतीगृह अथवा शिक्षकांसाठी आगळेवेगळे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली या जागेचा विकासाचे श्रेयवाद यावरून विकास मंडळाची निवडणूक ही महत्वाची बनली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com