21 आणि 22 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यात ‘अवकाळी’ संकट

21 आणि 22 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यात ‘अवकाळी’ संकट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांपुढे चिंतेचे ढग दाटले आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही 21 एप्रिल रोजी अवकाळी पावसाची शक्यता आहे. पण 22 एप्रिल रोजी कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांसह सांगली जिल्ह्यातही पावसाचं वातावरण असेल. तिथेही वारे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यानंतर 23 एप्रिल रोजी दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

राज्यात तापमानाने प्रचंड उच्चांक गाठला आहे. मार्च महिन्यात तर अंगाची अक्षरश: लाही लाही व्हावी इतकं ऊन पडलं. राज्यातील नगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा अक्षरश: 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला. विशेष म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये आजही उष्णतेची लाट आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 21 एप्रिल आणि 22 एप्रिल या दोन दिवसांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामध्ये उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी काही ठिकाणी 23 एप्रिलला देखील पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर 24 आणि 25 एप्रिल रोजी आकाश निरभ्र राहणार आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागतील. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण आहे. याशिवाय थंड वार्‍याचा वेग वाढला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. ऊन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशाप्रकारचा गारवा मिळत असल्याने त्या परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. पण ग्रामीण भागांमध्ये अशा वातावरणाता नागरिकांना फटका बसू शकतो. कारण शेतीचं नुकसाण होऊ शकतं.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात 21 आणि 22 एप्रिल रोजी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वारे हे 30 ते 40 किमी प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे शेतात काम करण्यासाठी जाणार्‍या नागरिकांनी काळजी घ्यावी. शक्यतो पाऊस आणि वादळी वारे सुरु झाले तर घराबाहेर पडणं टाळा किंवा सुरक्षित स्थळी थोडावेळ आराम करा.

Related Stories

No stories found.