जिल्ह्यावर अवकाळीचे संकट

डख यांच्या अंदाजाने शेतकरी सतर्क || श्रीरामपूरात पाऊस
जिल्ह्यावर अवकाळीचे संकट

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

ढगाळ वातावरण...विजांचा कडकडाट ऐन गहु, हरभरा काढणी सुरु असताना हे चित्र असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातही हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला हवामानाचा अंदाज शेतकर्‍यांना दिलासादायक ठरत आहे.

गहु आणि हरभरा या रब्बीतील काढणीचा हंगाम सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी ही दोन्ही पिके परिपक्व होवून काढणीस आलेली आहेत. त्यांच्या सोंगण्या सुरु आहेत. काढलेले गहु, हरभरा अंगणात वाळविण्याची प्रक्रिया सुरु आहे. या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. डख यांच्या हवामानाच्या अंदाजावर शेतकरी आवलंबून असल्याने पावसाचा इशारा त्यांना दिला आहे.

काल सायंकाळी सार्वमत शी बोलतांना पंजाबराव डख म्हणाले, रात्रीतून पश्चिम दिशेकडून पावसाला सुरुवात होईल. विजा चमकतील. आपण दिलेल्या अंदाजानुसार धुळे, नंदुरबार भागात पाऊस झाला. अंदाज दिल्यामुळे शेतकरी सतर्क राहिले. आता नगर जिल्ह्यात आज सोमवार ते बुधवार पर्यंत पावसाची चिन्हे आहेत. येत्या 8 मार्च पर्यंत पावसाचे वातावरण असेल. त्यानंतर पुन्हा पाच दिवस हवामान कोरडे असेल. 14 मार्चला पुन्हा पावसाचे वातावरण तयार होईल. 18 पर्यंत हे वातावरण तयार होईल. त्यामुळे अलिकडेच शेतकर्‍यांनी 9 ते 13 मार्च पर्यंत गहु काढून घ्यावा. अगदी आज सोमवारी 4 वाजेपर्यंत गहु, हरभरा काढून ठेवावा. न काढल्यास झाकुन तरी ठेवावा. कारण 20 मार्च पर्यंत खराबच वातावरण आहे.

काल नाशिक भागातील सिन्नर येथे पाऊस सुरु झाला होता. नगर जिल्ह्यात आज रात्री पासुन पावसाची चिन्हे आहेत. शिर्डीच्या बाजुला 10 किमी परिघात पाऊस पडू शकतो. विजेचा कडकडाट होवुन पाऊस पडेल.

श्रीरामपूरात पाऊस

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व परिसरात काल रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हलकासा अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा उत्पादक चिंतेत सापडले आहेत. काल दिवसभर अधून मधून ढगाळ वातारवरण होते.

उष्माही वाढला होता. रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच हलकासा पाऊस सुरू झाला. सध्या तालुक्यात गहू व हरभराची काढणी सुरू आहे. त्यात हे संकट उभे राहिल्याने शेतकरी काळजीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com