
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार व चालक यांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या आज (मंगळवार) करण्यात येणार आहे. 31 मे 2023 पर्यंत एकाच ठिकाणी पाच वर्षे (खंडीत/अखंडीत कालावधी) पूर्ण झालेल्या 915 पोलीस अंमलदार व 60 चालक अशा 975 जणांना सकाळी आठ वाजेपासून येथील पोलीस मुख्यालयाच्या रिक्रेशन हॉलमध्ये बोलविण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पध्दतीने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अंमलदारांना समोरासमोर विचारणा करून बदल्या केल्या जाणार आहे. त्यासाठी त्यांना एकत्रित बोलविण्यात आले आहे. कोविडमुळे अपवाद वगळता अंमलदारांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात वर्षांनुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अंमलदारांचे प्रमाण मोठे आहे. अधीक्षक ओला यांनी आदेश काढून बदल्याबाबत माहिती मागितली होती.
पोलीस अंमलदारांना पाच व त्यापेक्षा जास्त कालावधी एका पोलीस ठाण्यात झाला आहे त्यांनी अर्ज सादर केले आहेत. याशिवाय काही पोलीस अंमलदारांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. दरम्यान पाच व त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या 975 पोलीस अंमलदार व चालक यांच्या सुरूवातीला बदल्या करण्यात येणार आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहे.
अधीक्षक ओला यांनी काल, सोमवारी आदेश काढून बदलीपात्र अंमलदार व चालक यांना आज, मंगळवार पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अशी आहे प्रक्रिया
सकाळी 8 ते 10 यावेळेत 13 उपनिरीक्षकांसह 64 सहायक फौजदारांना बोलविण्यात आले आहे. सकाळी 10 ते 12 यावेळेत 164 पोलीस हवालदार, दुपारी 12 ते 2 यावेळेत 241 पोलीस नाईक यांना बोलविण्यात आले आहे. तर दुपारी तीन ते सहा यावेळेत 433 पोलीस शिपाई यांना बोलविले आहे. सायंकाळी सहा ते सात यावेळेत 60 चालक यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.