जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू

जिल्हा प्रशासनाचे आदेश : लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमावर आले निर्बंध
जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आधीच करोना सक्रिय असतांना त्यातच राज्यात आणि जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झालेला आहे. यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश शनिवारी काढले आहेत. या आदेशानुसार आता सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमातील उपस्थितवर निर्बंध आणले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी काढलेल्या आदेशात जिल्ह्यात शनिवारीपासून रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमाव बंदी लागू केली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसेच विवाह समारंभ बंद जागेत आयोजित करतांना एकावेळी 100 जणांची उपस्थिती मर्यादा पाळावी लागणार आहे. मोकळ्या जागेत होणार्‍या लग्नाला जास्ती जास्त 250 व त्याच्या ठिकाणच्या आसन क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीच्या मर्यादेचे पालन करावे लागणार आहे.

अन्य सामाजिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमात जेथे लोकांची सतत उपस्थिती राहिल असे कार्यक्रम बंद जागेत करत्यावेळी अधिकतम 100 उपस्थितीची मर्यादा पाळावी, असे कार्यक्रम मोकळ्या जागेत होत असल्यास जास्ती जास्त 250 व त्याच्या ठिकाणच्या आसन क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितीच्या मर्यादेचे पालन करावे लागणार आहे.

या कार्यक्रमाशिवाय अन्य कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेत करतांना आसन व्यवस्था निश्चित ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे, तसेच ज्या जागेत परंतू आसन व्यवस्था निश्चित नसलेल्या ठिकाणी जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के क्षमतेच्या उपस्थितीच्या मर्यादेचे पालन करावे लागणार आहे. क्रीडा विषयक स्पर्धा, मेळावे यांचे आयोजन करतांना प्रेक्षक आसन क्षमतेच्या 25 टक्के उपस्थितीची मर्यादा पाळावी. रेस्टॉरंट, जीम, स्पा, सिनेमागृह व नाट्यगृहे हे तेथील आसन क्षमतेच्या 50 टक्के अधिन राहुन सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी एकूण आसान क्षमता व परवानगी देण्यात आलेल्या 50 टक्के क्षमताबाबत सुचना फलक दर्शनी भागात प्रदर्शीत करण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com