जिल्ह्यात 57 हजार कुणबीच्या नोंदी

जात वैधता प्रमाणपत्र विभागाकडे 56 हजार 677 तर झेडपीकडे 4 हजार 11
जिल्ह्यात 57 हजार कुणबीच्या नोंदी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यात मंगळवारअखेर 56 हजार 688 प्रमाणपत्रांच्या नोंदणी जिल्हा प्रशासनाच्या हाती आल्या आहेत. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणी शोधण्याची मोहिम युध्द पातळीवर सुरू असून यात आज (बुधवारी) दुप्पटीने वाढ होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाचा आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आता ही मोहिम संपूर्ण राज्यात ही राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर नगर जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला असून या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहाय्यक आयुक्ती (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दोन दिवसात प्राथमिक शाळांमधील 11 लाख 14 हजार 958 शाळा सोडल्याच्या रजिस्टरमधील नोंदणी तपासल्या असून यात 4 हजार 11 जणांच्या कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. तर जात प्रमाणपत्र वैधता विभागाने 52 हजार 677 जणांना कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत 56 हजार 688 जणांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदणीची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यासह महसूल, पोलीस यंत्रणा, खरेदी दस्तावेज, नगर शहरातील वस्तूसंग्रहालय, जन्म-मृत्यूच्या नोंदीच्या रेकॉर्ड यांचा शोध घेण्यात येत असून सर्व शासकीय विभाग कुणबी नोंदी शोधण्यासाठी कामाला लावण्यात आले आहे.

जिल्ह्यात लाखोंच्या घरात कुणबीच्या नोंदी सापडण्याचा अंदाज प्रशासनाला आहे. सर्व शासकीय विभागात याबाबतची माहिती जमा करण्यात येत असून येत्या दोन दिवसांत हा आकडा अंतिम होण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाला आहे. जिल्ह्यात आढळणार्‍या कुणबीच्या नोंदीची माहिती संकलित झाल्यावर ती राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com