जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी

पालकमंत्री विखे-पाटील || आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पुढील पंधरा दिवसात जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी. शासन आपल्या दारी उपक्रमात शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा आढावा पालकमंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पकंज जावळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख, सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनांचा आढावा घेतांना पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील ओढे-नाले युध्दपातळीवर स्वच्छता करण्यात यावी. नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवावी. धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. जनावरांना चारा कमी पडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात यावी. शासन आपल्या दारी उपक्रमाचा आढावा घेतांना विखे पाटील म्हणाले की, शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत शासन आपल्या दारी उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करावी.

सर्वसामान्यांना योजनांचा तत्परतेने लाभ देण्याचे काम करावे. संवाद मोहीम राबविण्यात यावी. जिल्ह्यातील औद्योगिक व पर्यटन विकासाला चालना मिळावी. यासाठी एमआयडीसी, पर्यटन महामंडळ यांनी विकासाचा आराखडा तयार करावा. औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी छोटे-छोटे क्लस्टर तयार करा. धार्मिक स्थळांच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यावर भर देण्यात यावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात केलेल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामांच्या ठिकाणी फलक त्वरित प्रदर्शित करण्यात यावेत. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com