
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर केला. यात अहमदनगर जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल 94.41 टक्के लागला असून जिल्हा पुणे विभागात दुसर्या स्थानावर राहिला आहे.
करोना रूग्णसंख्या कमी झाल्यामुळे बारावीची यंदा ऑफलाईन पध्दतीने परीक्षा झाली होती. त्यामुळे या निकालाची सर्वांनाच उत्सुकता होती. बुधवारी दुपारी एक वाजता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल 99.78 टक्के लागला होता. तेव्हा करोनामुळे परीक्षा झालेल्या नव्हत्या. केवळ मूल्यमापनावर निकाल घोषित केल्याने निकाल वाढला होता. त्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का 5 टक्क्यांनी घसरलेला आहे.
जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 98.79 टक्के लागला आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण हे 98.60 तर मुलींचे प्रमाण 99.04 टक्के आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 93.44 टक्के लागला असून यामध्ये मुलांचे प्रमाण 91.35 तर मुलींचे प्रमाण 95.83 टक्के आहे. कला शाखेचा निकाल 86.97 टक्के असून यामध्ये मुलांचे प्रमाण 83.99 तर मुलींचे प्रमाण 91.91 टक्के आहे.
जिल्ह्यातून विज्ञान शाखेमधील 35 हजार 600 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यापैकी 35 हजार 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमधील 17 हजार 794 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यापैकी 15 हजार 477 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी वाणिज्य शाखेमधील 8 हजार 496 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यातील 7 हजार 939 विद्यार्थी पास झाले आहेत.
तालुकानिहाय निकाल
अकोले (93.87), जामखेड (97.51), कर्जत (95.67), कोपरगाव (89.03), नगर (96.92), नेवासा (95.51), पारनेर (97.88), पाथर्डी (95.55), राहाता (93.83), राहुरी (90.24), संगमनेर (94.03), शेवगाव (98.57), श्रीगोंदा (92.33), श्रीरामपूर (86.76).