सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 115. 7 टक्के पाऊस

पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 115. 7 टक्के पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 19 ते 21 सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 518.6 मि.मी. (115.7 टक्के) पर्जन्यमान झालेले आहे. आता पुन्हा पुढील तीन दिवस वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून नगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दुसरीकडे जिल्ह्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीत नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍यातून 35 हजार 276 क्यूसेस व जायकवाडी धरणातून 80 हजार 172 क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे 36 हजार 874 क्युसेस, घोड नदीत घोड धरणातून 16 हजार 100 क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 2 हजार 32 क्युसेस, निळवंडे धरण 3 हजार 514 क्यूसेस व ओझर बंधारा 8 हजार 327 क्यूसेस, मुळा नदीत मुळा धरणातून 7 हजार क्यूसेस आणि कुकडी नदीत येडगाव धरणातून 700 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे. अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यायातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूसख्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्यार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्थानक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही निर्मळ यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com